Join us  

शिवाजी पार्कमध्ये छत्री घेऊन उभे होते का?; शरद पवारांच्या टीकेनंतर आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 5:10 PM

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना टोला लगावला. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं असं म्हणत निशाणा साधला आहे. 

आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा, असं म्हणत राज ठाकरेंनीशरद पवारांना टोला लगावला. 

राज ठाकरेंच्या या विधानानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली, तेव्हा तुम्ही काय छत्री घेऊन उभे होते का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरेंच्या भाषणालाच काही अर्थ उरलेला नाही, त्यात काही मटेरियल नाही आहे. बोलायचं म्हणून बोलतात, लोक ऐकायला जातात कॉमेडी शो प्रत्येकालाच आवडतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचा तिथला खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे, असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. 

तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय?

तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की, महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं, असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेजितेंद्र आव्हाडमनसेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार