Join us  

'तुमच्या धमक्यांच्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढायला लावू नका'; ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा

By मुकेश चव्हाण | Published: November 28, 2020 2:15 PM

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून सरकारच्या कामाची पोलखोल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही'', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर आता सरकारकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावून आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपाची जुनी पद्धत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि इतर भाजपा नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकार सर्वच बाबतीत सपशेल अपयशी ठरल्याचं सांगत सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं सांगितलं. सरकारने पहिल्या वर्षात फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचं काम केल्याची टीका देवेंद्र फडणवीसांना केली.

अर्णब, कंगना प्रकरणात सरकार तोंडावर आपटलं-

सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि मुंबई हायकोर्टाने कंगना प्रकरणात दिलेल्या निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. ''सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयातूनच सरकारच्या कामगिरीची माहिती कळते. कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तर मुंबई हायकोर्टानेही कंगनाविरोधातील कारवाई अप्रमाणिक आणि अशुद्ध हेतूने केल्याचा मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत संजय राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणारी नाही असं कोर्टाने झापलं'', अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. 

शेतकऱ्यांना दिलेलं वचन मुख्यमंत्री विसरले-

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना न दिलेलं वचन मुख्यमंत्र्यांना लक्षात राहीलं, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन ते विसरले, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. धान उत्पादकांना बोनस दिला याबाबत सरकारचं स्वागतच आहे पण सोयाबीन आणि कापूर उत्पादकांचं काय? त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसधनंजय मुंडेभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडी