The minimum temperature in Mumbai dropped by 7 degrees due to rains after the cyclone | निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या किमान तापमानात तब्बल ७ अंशानी घट झाली

निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या किमान तापमानात तब्बल ७ अंशानी घट झाली

 

  • पावसाची नोंद ६५ ते ७० मिलीमीटर
  • किमान तापमान २९ अंशाहून थेट २२ अंशावर
  • मुंबईकरांची रात्र गारेगार
  • मुंबईकरांना झाले सुर्यनारायणाचे दर्शन

 

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा किंचित परिणाम म्हणून गुरुवारीदेखील मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गुरुवारी दिवसासह रात्री मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईकरांना गुरुवारी रात्री गारेगार वातावरणाचा अनुभव घेता आला. आणि शुक्रवारची सकाळ उलटते तोवर मुंबईकरांना सुर्यनारायणाने दर्शन दिले. निसर्ग चक्रीवादळाचे ढग विरल्याने शुक्रवारी दिवसभर मुंबईतील आकाश मोकळे राहिले. परिणामी दिवसभर मुंबईकरांना ऊन्हाचा तडाखा बसला. एकंदर निसर्ग चक्रीवादळ घेऊन आलेल्या पावसाने मुंबईकरांना जसा गारेगार  वातावरणाचा अनुभव दिला; त्याचप्रमाणे निसर्ग चक्रीवादळ शमल्यानंतर पडलेल्या ऊन्हाने मुंबईकरांना तडाख्याच्या ऊन्हाचाही अनुभव दिला. दरम्यान, याच गेल्या २४ तासांत पावसाची नोंद ६५ ते ७० मिलीमीटर झाली असून, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामुळे किमान तापमानात तब्बल ७ अंशाची घट नोंदविण्यात आली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून, निसर्ग चक्रीवादळ आता पुर्णत: विरले असून, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मुंबईचा विचार करता निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून ९० किलोमीटर लांब गेले तरी बुधवारी रात्रीसह, गुरुवारी दिवसा आणि रात्री त्याचा किंचित परिणाम दिसून आला. गुरुवारी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. गुरुवारी रात्री बारानंतर मात्र पावसाने ठिकठिकाणी जोर पकडला होता. सर्वसाधारणरित्या दक्षिण मुंबईच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक असतो. मात्र गुरुवारच्या रात्री दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर अधिक असल्याचे निदर्शनास आले. मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोसळलेल्या एकूण पावसाची नोंद ६५ ते ७० मिलीमीटर एवढी करण्यात आली. पावसाची बहुतांशी नोंद ही ४ जूनच्या सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत झाली. सलग पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या तापमानातही घट झाली. मुंबईचे किमान तापमान गुरुवारी २२ अंश नोंदविण्यात आले. जे किमान तापमान बुधवारी २९ अंशाच्या आसपास होते. एका दिवसांत किमान तापमानात तब्बल ७ अशांची घसरण झाली. किमान तापमानात घसरण झाल्याने मुंबईकरांना गारेगार वातावरणाचा अनुभव घेता आला. दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी मुंबईकरांना झोडपलेल्या पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. दिवसभर मुंबईच्या आकाशात सुर्य तळपळत होता. पावसाने उघडीप घेतल्याने दोन थंड पडलेले व्यवहार पुन्हा शुक्रवारी पुर्वपदावर आले असले तरी लॉकडाऊनचा त्यावर परिणाम दिसून येत होता.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The minimum temperature in Mumbai dropped by 7 degrees due to rains after the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.