गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी, दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:45 IST2025-07-09T13:43:14+5:302025-07-09T13:45:53+5:30
Mill Workers Houses in Mumbai : "मुंबईत ७६ एकर जागा उपलब्ध, तरीही गिरणी कामगारांना मुंबईपासून दूर पाठवलं जातंय"

गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी, दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध- जयंत पाटील
Mill Workers Houses in Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न उपस्थित केला. गिरणी कामगारांचा दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध आहे. त्यांना मुंबईतच घर द्या, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर संभ्रमावस्था आहे. त्या लोकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या १४ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून लाँग मार्च काढला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या सहयोगाने गृहनिर्माण योजना लागू केली होती. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. या मागणीला २५ एप्रिल २०२५च्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहयाद्री अतिथीगृहात सहमती दर्शविली आहे. त्यासाठी मुंबईत उपलब्ध असलेल्या जागांचीही माहिती शासनाला देण्यात आली आहे असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मुंबईत जवळपास ७६ एकर जागा उपलब्ध आहे. पण गिरणी कामगारांना मुंबईपासून दूर शेलू आणि वांगणीला पाठवत आहे. सरकारच्या भूमिकेला कामगारांनी पूर्णतः विरोध दर्शविला आहे. संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली ही योजना शासनाने ताबडतोब रद्द करावी, अशी त्यांची मागणी आहे. शासनाने १५ मार्च २०२४ रोजी जो अध्यादेश पारित केला आहे. त्यात शेलू व वांगणी येथील घरे नाकारल्यास कामगारांचा घराचा हक्क राहणार नाही, असे म्हटले आहे. हा कुठला न्याय आहे? या अध्यादेशातील हा जाचक मुद्दा रद्द करायला हवा. तसेच शासनाने या गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावीत यासाठी विविध पर्यायांची चाचपणी करावी, अशी मागणी त्यांनी शेवटी केली.