मुंबईत भाजीपाल्यासह दूध टंचाई; पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:57 AM2019-08-08T02:57:06+5:302019-08-08T06:22:08+5:30

भाजीपाल्याचे दर वाढले; फरसबी २५० रुपये किलो, तोंडली १६० रुपयांवर

Milk scarcity with vegetables in Mumbai | मुंबईत भाजीपाल्यासह दूध टंचाई; पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा फटका

मुंबईत भाजीपाल्यासह दूध टंचाई; पश्चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा फटका

Next

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला आणि दुधावर झाला आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची मागणीपेक्षा आवक कमी होत असून, किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. चांगल्या दर्जाची फरसबी २०० ते २४० रुपये व तोंडली १२० ते १६० रुपये किलो दराने विकली जात आहेत. इतर भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५५० ते ६५० ट्रक व टेम्पोची नियमित आवक होत असते; परंतु पावसामुळे आवक कमी झाली आहे. बुधवारी मार्केटमध्ये फक्त ४८३ वाहनांची आवक झाली आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली असून, त्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये फरसबीचे दर १०० ते १२० रुपये किलो झाले असून किरकोळ मार्केटमध्ये २०० ते २४० रुपये किलो दराने चांगल्या दर्जाच्या फरसबीची विक्री होऊ लागली आहे. सर्वच भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलो झाले आहेत. तोंडलीचाही तुटवडा निर्माण झाला असून, त्याचे दरही १२० ते १६० रुपयांवर गेले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारासह दक्षिणेकडील राज्यातून येणारी आवक कमी झाली आहे. नाशिक, पुणे व गुजरातवरून येणाऱ्या मालावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळेच भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. भिजल्यामुळे भाजीपाला खराब होत आहे. याशिवाय होलसेल मार्केटमध्येही दर वाढल्यामुळे किरकोळ मार्केटमध्ये भाववाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

१३ लाख लीटर दूध कमी
कोल्हापूर, सांगली व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पूरसदृश स्थिती असून, त्याचा फटका दूध संकलनावर झाला आहे. नवी मुंबई परिसरातील दूध डेअरीमध्ये जवळपास १३ लाख लीटर दूध कमी आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबई, नवी मुंबई परिसरात दुधाची टंचाई निर्माण होईल अशी माहिती दूध कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे. वारणा, गोकूळ, कृष्णा व इतर दूध कंपन्यांमध्ये पुरेसे दूध आलेले नाही. या सर्वांचा फटका वितरणावर होत असल्याची माहिती किरकोळ दूधविक्रेत्यांनीही दिली आहे.

Web Title: Milk scarcity with vegetables in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.