म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:31 IST2025-07-27T12:31:55+5:302025-07-27T12:31:55+5:30

म्हाडाच्या जमिनीवरील वसाहतींचा पुनर्विकास 

mhada will soon build staff quarters for police | म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स

म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या जागेवरील पोलिस वसाहतींची वाईट अवस्था झाली आहे. या वसाहतींचा पुनर्विकास गरजेचे आहे. पोलिसांनीही चांगली घरे मिळावीत यासाठी म्हाडा काम करीत आहे. त्यानुसार, म्हाडाकडून २७ पैकी १७ पोलिस वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वसाहतींचा एकत्रित पुनर्विकास होणार असून, १७ पैकी ७ वसाहतींच्या जागेत स्वतंत्र तीन निविदांद्वारे केला जाईल, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने  ‘लोकमत’ला दिली.

पोलिस वसाहतीच्या पुनर्विकासाचा पहिला प्रस्ताव २०२३ च्या जानेवारीत मांडण्यात आला होता. १७ वसाहतीमधील ४,७२५ घरांचा पुनर्विकास करण्याची तयारी प्राधिकरणाने केली होती. ज्या वसाहती विखुरलेल्या आहेत, त्यांचे सात वसाहतीमध्ये एकत्रीकरण करून मोठी वसाहत केली जाईल. यात मुख्यत: पोलिसांसाठीच घरे बांधली जातील. तीन समूहामध्ये हा पुनर्विकास केला जाईल. पूर्व, पश्चिम उपनगर आणि शहर अशा समूहात हा प्रकल्प राबविला जाईल. जेवढे बांधकाम क्षेत्रफळ मिळेल, त्या सगळ्या क्षेत्रावर पोलिसांसाठीच घरे असणार आहेत.  यात ४८४ फुटांची ४ हजार २२५ आणि ६४६ फुटांची ५०० घरांचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

१० ठिकाणी सर्वसामान्यांना घरे

पोलिस वसाहतींचा पुनर्विकासानंतर उरलेल्या १० वसाहतींच्या जमिनीवर सामान्यांसाठी घरे बांधली जातील. दरम्यान, याबाबत शासकीय स्तरावर बैठक होणार आहे.

या वसाहतींचा विकास

घाटकोपरमधील जवाहर नगर, टिळक नगर, धारावीमधील पीएमजीपी, चांदिवली, कुर्ला नेहरू नगर, मालाड, मजासवाडी, डी.एन.नगर, गोरेगावमधील शास्त्री नगर, मेघवाडी, आरामनगर, पंतनगर, वनराई आणि गोरेगाव येथील उन्नत नगर येथील पोलिस वसाहतींचा पुनर्विकास अपेक्षित आहे.

 

Web Title: mhada will soon build staff quarters for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.