मुंबई : कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
कोकण मंडळाच्या विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील विक्री न झालेली घरे उपलब्ध आहेत. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण करतेवेळी आधार कार्ड, पॅनकार्डची छायांकित प्रत, स्वयंघोषणापत्र आदी बाबी ऑनलाइन वेबसाईटवर अपलोड करावयाच्या आहेत. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होईल. पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाइल तयार होईल. अर्जदाराचे प्रोफाइल तयार झाल्यानंतर अर्जदारास ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ योजनेतील मंडळनिहाय उपलब्ध घरांची माहिती फ्लॅट नंबरसह मिळणार आहे. अर्जदारास या घरांमधून मजला व घर आपल्या पसंतीनुसार निवडता येणार आहे.
नव्या वेबसाईटमुळे अर्जदारास आपल्या पसंतीचे घर निवडण्याची मुभा आहे. अर्जदारांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळाला आहे. ज्याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरे अर्जदार वेबसाईटवर पाहू शकतात. त्यांच्या पात्रता व पसंतीनुसार विशिष्ट घराची निवड करू शकणार आहेत. योजना व घरांच्या सविस्तर माहितीनुसार अधिक उचित निर्णय अर्जदाराला घेण्याची संधी आहे.
रेवती गायकर, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा