MHADAKonkanLotteryResult2024: ‘म्हाडा’च्या कोकण मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गतच्या २,१४७ सदनिका व ११७ भूखंड विक्रीकरिता उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लॉटरी काढण्यात येणार आहे.
बुधवारी दुपारी १ वा. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होईल. अर्जदारांना हा निकाल मोबाइलवर ‘एसएमएस’द्वारे, ई-मेलद्वारे तसेच ॲपवर प्राप्त होणार आहे.
जवळपास २५ हजार अर्ज
११ ऑक्टोबर अर्ज प्रक्रियेला रोजी प्रारंभ करण्यात आला. ६ जानेवारी रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली. ७ जानेवारी रोजी रात्री ११:५९ पर्यंत अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत होती.
यासाठी सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. लॉटरीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी २० जानेवारी रोजी सायंकाळी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली.
विजेत्यांना म्हाडा पाठवणार पत्र
२४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लॉटरीमध्ये सहभाग घेणाऱ्या अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली.
लॉटरीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून, त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे.