माझा त्रास कधीच थांबणार नाही, म्हणत म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 07:42 IST2025-07-28T07:42:33+5:302025-07-28T07:42:54+5:30

याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mhada deputy registrar wife life ended said my troubles will never stop | माझा त्रास कधीच थांबणार नाही, म्हणत म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीची आत्महत्या

माझा त्रास कधीच थांबणार नाही, म्हणत म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'माझा त्रास कधीच थांबणार नाही. मी त्यांना नको आहे,' असे म्हणत म्हाडातील उपनिबंधकांच्या पत्नीने शनिवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. 'मी उच्चपदस्थ अधिकारी आहे, तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही' असे टोमणे मारून पतीने पैशांसाठी तगादा लावल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या भावाने केला. त्यानुसार समता नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत रविवारी पतीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणू बापू कटरे (४२) असे विवाहितेचे नाव असून ती कांदिवली येथील प्रतिष्ठित गृहसंकुलात पती आणि दोन मुलांसह राहत होती. मृत महिलेचा भाऊ सचिन शेजाळ यांच्या तक्रारीनुसार, रेणूची सासू ही लग्नात कमी हुंडा दिला म्हणून टोमणे मारायची. त्यासाठी वडिलांनी ८ तोळे सोन्याच्या बांगड्या दिल्या. त्यापाठोपाठ २०२३ मध्ये १२ लाख आणि २०२४ साली १० लाख दिले. पतीने तिला काठीने मारहाण केली होती, असाही आरोप मृत महिलेच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. बैठक घेण्यापूर्वी संपविले आयुष्य वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांनी २७ जुलै रोजी बैठक घेण्याचे ठरवले. तिच्या पतीने आधी होकार दिला. मात्र नंतर नकार दिला. त्यामुळे ती आणखी नैराश्यात गेली.

तो कॉल अखेरचा ठरला

२६ जुलैला सकाळी रेणू यांनी भावाला कॉल केला. त्यावेळी पती विनाकारण शिवीगाळ, मारहाण करतात. वाद मिटवण्यासाठी ठरवलेल्या मिटिंगला येण्यास टाळाटाळ करतात. माझा त्रास थांबणार नाही, असे म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर, सायंकाळी ओळखीच्या डॉक्टरला कॉल करून 'पतीने फसवले, तो मिटिंग टाळत आहे. त्यांना मी नको आहे' असे बोलून फोन ठेवला. डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला तेव्हा तिने तो उचलला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क केला पण तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा पतीला कॉल केला. त्याने रेणूने स्वतःला फ्लॅटमध्ये बंद केले असे सांगितले, असे तक्रारीत नमूद आहे.

 

Web Title: mhada deputy registrar wife life ended said my troubles will never stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.