मेट्रोची हौस पुरी, गड्या आपली ‘बेस्ट’च बरी...! पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येत सहा हजारांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:16 IST2025-10-11T10:16:39+5:302025-10-11T10:16:51+5:30
सामान्यत: दररोज २४ लाख प्रवासी बसने प्रवास करतात. मेट्रो ३ थेट आरेपर्यंत असल्याने या परिसरातील ‘बेस्ट’च्या वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवासी संख्येत घट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

मेट्रोची हौस पुरी, गड्या आपली ‘बेस्ट’च बरी...! पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येत सहा हजारांची वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कफ परेड ते आरे जेव्हीएलआर मेट्रो ३ सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बेस्टसह इतर वाहतुकीवरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत सहा हजारांची वाढ दिसून आली. मेट्रोचे तिकीट दर सामान्य प्रवाशांसाठी परवडणारे नाहीत. त्यामुळे ‘मेट्रोची हौस पुरी, गड्या आपली बेस्ट बरी’ असे मत सर्वसामान्यांनी मुंबईकरांनी व्यक्त केले.
सामान्यत: दररोज २४ लाख प्रवासी बसने प्रवास करतात. मेट्रो ३ थेट आरेपर्यंत असल्याने या परिसरातील ‘बेस्ट’च्या वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवासी संख्येत घट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेषत: सीएसएमटी, विधान भवन ते कफ परेडसारख्या परिसरात नॉन एसी ‘बेस्ट’ला पर्याय म्हणून मेट्रोकडे पहिले जाऊ शकते. मात्र, दूरच्या प्रवासासाठी मुंबईकर ‘बेस्टला’च प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. बुधवारपर्यंत २४ लाख आठ हजारांवर असलेली बेस्ट प्रवासी संख्या गुरुवारी थेट सहा हजारांनी वाढून २४ लाख १४ हजारांवर गेली आहे.
छोट्या मार्गावर मेट्रोच भारी
सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटरपर्यंत ‘बेस्ट’ प्रवाशांना एसी बससाठी १२ रुपये आणि नॉन एसी बससाठी १० रुपये मोजावे लागतात. याच मार्गावर मेट्रोसाठी तिकिटाचा दर २० रुपये आहे. ‘बेस्ट’ प्रवासात सिग्नल, वाहतूक कोंडी आणि प्रवास पाहता भुयारी मेट्रोचा पर्याय प्रवासी निवडू शकतात, असे जाणकारांनी सांगितले.
तारीख बेस्ट प्रवासी संख्या
६ ऑक्टोबर २४,१३,६१८
७ ऑक्टोबर २४,०७,७४२
८ ऑक्टोबर २४,०८,५९७
९ ऑक्टोबर २४,१४,९१८
छोट्या मार्गावर बेस्टच्या प्रवासी संख्येत बदल होऊ शकतो. मात्र, दूरच्या मार्गासाठी बेस्ट सोयीची आहे. तिकीट दरांतील फरकामुळे बेस्टला प्राधान्य राहील.
रूपेश शेलटकर,
- आपली बेस्ट आपल्यासाठी