लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या गरोडिया नगर मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान खालून जाणाऱ्या वाहनावर लाकडाची फळी पडून दुर्घटना झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी घडली. चारचाकी वाहनाची चालकाच्या बाजूकडील काच भेदून ही फळी आतमध्ये शिरली. यात वाहनाचे नुकसान झाले असून वाहनचालक थोडक्यात बचावला आहे. या याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन मंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंत्राटदारास नोटीस बजावून आर्थिक दंड ठोठावला आहे. तसेच वाहन मालकाला नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
घाटकोपर येथील गरोडिया नगर मेट्रो स्थानकाचे काम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकाचे काम शुक्रवारी दुपारी सुरू होते. यावेळी रस्त्यावरून वाहतूकही सुरू होते. कामादरम्यान एक फळी खाली पडली. या घटनेनंतर टाटा प्रोजेक्टस लिमिटेड या कंत्राटदाराने वाहनचालकाला नुकसान भरपाई दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएने करारातील नियमानुसार कंत्राटदारास दंड ठोठावला आहे.
दरम्यान, एमएमआरडीएने कंत्राटदाराला सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. यापुढे अशी घटना घडणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचेही निर्देश दिले आहेत.