Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:22 IST

मंगळवारी एमएमआरसीने तात्काळ गाळ आणि राडारोडा हटविण्याचे काम हाती घेतले.

मुंबई : पावसाचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेले भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक स्थानक पुढील एक ते दोन दिवसांत पुन्हा सेवेत दाखल केले जाणार आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.

आचार्य अत्रे चौक स्थानकात सोमवारी पाणी शिरल्याने घडलेल्या दुर्घटनेबाबत ‘एमएमआरसी’वर टीकेची झोड उठविण्यात आली. तसेच या मेट्रो मार्गिकेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर भिडे यांनी मेट्रो मार्गिका सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच या मार्गिकेवरील कामे पूर्ण झालेल्या कोणत्याही स्थानकांत पाणी शिरले नसल्याची पुष्टी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर मंगळवारी एमएमआरसीने तात्काळ गाळ आणि राडारोडा हटविण्याचे काम हाती घेतले. हे मेट्रो स्थानक साफ करून यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची लगबग एमएमआरसीकडून सुरू होती.

स्थानक का सुरू केले?

सध्या ही प्रवेशद्वाराची कामे अपूर्ण असताना स्थानक का खुले केले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र सध्याची प्रवासी संख्या पाहता ही दोन प्रवेशद्वारे पुरेशी आहेत. तसेच आचार्य अत्रे चौक स्थानकाला कनेक्टीव्ही मिळावी हा स्थानक सुरू करण्यामागे उद्देश होता, असेही भिडे म्हणाल्या.

एका तासात ११ लाख लीटर पाणी 

आचार्य अत्रे चौक स्थानकासाठी एकूण सहा प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग असतील. त्यातील दोन मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, तीन मार्गांची कामे दोन ते तीन महिन्यांत होतील. यातील एका निर्माणाधिन प्रवेशद्वारावरील पीट भोवतीची स्टॉर्म वॉटर यंत्रणा अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या हाय टाइडमुळे भरून गेली. पाण्याचा विसर्ग समुद्रात न झाल्याने ते मेट्रोच्या पीटमध्ये आले. या पीटमध्ये एका तासात ११ लाख लीटर पाणी जमा झाले. त्याला जाण्यासाठी जागा नसल्याने ते स्थानकात शिरले. या प्रवेशद्वाराचे काम चालू असल्याने त्याच्या बाहेर बंड वॉल उभारून पूरनियंत्रण यंत्रणा उभारली होती. मात्र त्यात एवढे पाणी थोपवून ठेवण्याची क्षमता नव्हती. त्यातून हे पाणी या वॉलवरून स्थानकात शिरले, अशी माहिती भिडे यांनी दिली. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमेट्रो