मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:08 IST2025-11-07T06:07:10+5:302025-11-07T06:08:00+5:30
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार

मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारने अंधेरी (प) ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील भाडेदरात पुढील काही महिन्यांत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे ऑगस्टमध्ये पाठविला होता. राज्य सरकारने गेल्या महिन्यात त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने समिती गठित करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव गेल्या महिन्यातच केंद्र सरकारच्या 'सॉल्ट पॅन' विभागाकडे पाठविला. त्यामुळे एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या काळात अधिक भाडे भरावे लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे.
अन्य मेट्रोंच्या तुलनेत एमएमआरडीए मेट्रोचे भाडे किती?
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर सर्वाधिक भाडे आकारले जात आहे. मेट्रो ३ वर ८-१२ किमी अंतरासाठी ४० रुपये भाडे आकारले जाते. त्याचवेळी एमएमआरडीएच्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवर प्रती ३-१२ किमीसाठी २० रुपये भाडे आकारले जाते. मेट्रो १ वर ८ ते ११.४ किमी अंतरासाठी ४० रुपये आकारले जाते. भाड्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे त्याची शिफारस करेल. त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच भाडेवाढ लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
भाडेवाढीची शक्यता का?
एमएमआरडीएच्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) ३५.१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाते. एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवरून सद्यस्थितीत दरदिवशी ३ लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जातो. या प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी त्यांच्यावरून ९ लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित प्रवासी संख्येपासून या मेट्रो अजून दूर आहेत. परिणामी मेट्रोला उत्पन्नही मर्यादित मिळत नसून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मुंबई महानगरातील अन्य मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोपेक्षा अधिक आहे.
कोणत्या मेट्रोचे भाडे वाढणार?
- अंधेरी (प) ते दहिसर मेट्रो २अ - १८.६ किमी लांबी
- गुंदवली ते दहिसर मेट्रो ७- १६.५ किमी लांबी