उद्घाटन हाेण्याआधीच भुयारी मेट्रोमध्ये बिघाड; सांताक्रूझ मेट्रो स्थानकाजवळ घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:51 IST2025-10-04T10:50:31+5:302025-10-04T10:51:08+5:30
मुंबईतील पहिल्या भुयारी कफ परेड ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या अखेरच्या टप्प्यातील मार्गाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणासाठी काही दिवस शिल्लक असताना गाडीत मोठा तांत्रिक बिघाड झाला.

उद्घाटन हाेण्याआधीच भुयारी मेट्रोमध्ये बिघाड; सांताक्रूझ मेट्रो स्थानकाजवळ घडली घटना
मुंबई : मुंबईतील पहिल्या भुयारी कफ परेड ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या अखेरच्या टप्प्यातील मार्गाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणासाठी काही दिवस शिल्लक असताना गाडीत मोठा तांत्रिक बिघाड झाला. सांताक्रूझ मेट्रो स्थानकाजवळ ही बिघाड झाल्याची घटना घडली. त्यानंतर प्रवाशांना सांताक्रूझ मेट्रो स्थानकात उतरविण्याची वेळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसी) आली.
मेट्रो ३ मार्गिकेवर दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी ही घटना घडली. आरे जेव्हीएलआर येथून ही मेट्रो आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या दिशेने निघाली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी १ टर्मिनल मेट्रो स्थानकातून ही गाडी सांताक्रूझ स्टेशनच्या दिशेने जात असताना गाडीत बिघाड झाला.
प्रवाशांना त्वरित उतरवले
सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून गाडीतील सर्व प्रवाशांना सांताक्रूझ स्थानकावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. ही गाडी सध्या सविस्तर तांत्रिक तपासणीसाठी बीकेसी लूपलाइनवर नेण्यात आली आहे. संबंधित गाडीची सेवा रद्द करण्यात आली असली, तरी इतर सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत, अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.