मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 05:41 IST2025-05-26T05:41:29+5:302025-05-26T05:41:29+5:30

मेट्रो ४ आणि मेट्रो ६ मार्गिका सुरू होण्यासाठी आता प्रवाशांना करावी लागणार अधिक प्रतीक्षा

Metro appointed a contractor a year and a half ago the construction of the car shed is still stalled | मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

मुंबई :मुंबई महानगरातील मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारत असले तरी अद्याप कारशेडचा प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो ६ आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करून दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप या कारशेडची जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात आलेली नाही. परिणामी, अजूनही कारशेडचे काम सुरू होऊ शकले नाही. त्यातून या दोन्ही मार्गिका सुरू होण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मेट्रो ४ आणि मेट्रो ६ मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे एकत्रित कारशेड उभारण्यात येणार होते. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादात कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी मिळू शकली नाही. परिणामी, हे कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आले. मोघरपाडा येथील सरकारी जागेवर सुमारे १६७ शेतकरी बाधित होत आहेत. यातील भाडेतत्त्वावर जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना २२.५ टक्के विकसित भूखंड, तर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना १२.५ विकसित भूखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या जमिनीचे भूसंपादन करून ती एमएमआरडीएला हस्तांतरित केली जाणार होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने कागदोपत्री ही जागा एमएमआरडीएला दिली असली तरी प्रत्यक्ष अधिग्रहण होऊ शकले नाही. परिणामी, कारशेडचे कामही सुरू झालेले नाही. 

मेट्रो ६ चा तिढा सुटेनाच 

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेची कांजूरमार्ग येथील जागाही न्यायालयीन वादात अडकली आहे. या जागेवरील दावा राज्य सरकारने नुकताच सोडला आहे.
 
त्यानंतर केंद्र सरकारच्या सॉल्ट पॅन विभागाने या जागेवरील याचिका मागे घेतली आहे. 

आता राज्य सरकारकडून ही जागा मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल. तसेच त्यावर मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकण्याची विनंती केली जाईल. 

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरदेखील ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. या जागेच्या मालकीवर दावा करणाऱ्या याचिका खासगी व्यक्तींनी टाकल्या असून त्या केसचा तिढा सुटेपर्यंत कारशेडच्या कामाला सुरुवात होऊ शकणार नाही.

फेऱ्या अधिक अंतराने 

मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेवर तात्पुरते पीट उभारून कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू केला जाणार आहे. मात्र, कारशेड नसल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर अधिक असेल. त्यातही वडाळा ते कासारवडवली मार्ग २०२७ मध्येच शक्य होईल.
 

Web Title: Metro appointed a contractor a year and a half ago the construction of the car shed is still stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.