मेट्राे-९ मार्गिकेचे उद्घाटन; दोन तासांचा प्रवास ३० मिनिटांत; मीराराेड-भाईंदरही याच वर्षी: CM

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 07:09 IST2026-04-08T07:09:02+5:302026-04-08T07:09:33+5:30

मेट्रो २बी मार्गिकेचा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मंडाळेपर्यंतचा प्रवास शक्य

Metro-9 line inaugurated; Two-hour journey in 30 minutes; Mira Road-Bhayander also in the same year: Devendra Fadnavis | मेट्राे-९ मार्गिकेचे उद्घाटन; दोन तासांचा प्रवास ३० मिनिटांत; मीराराेड-भाईंदरही याच वर्षी: CM

मेट्राे-९ मार्गिकेचे उद्घाटन; दोन तासांचा प्रवास ३० मिनिटांत; मीराराेड-भाईंदरही याच वर्षी: CM

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दुसऱ्या टप्प्यात साईबाबानगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रवासासाठी सध्या एक ते दोन तास लागतात. मेट्रो सेवेमुळे हा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण समारंभास फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कौशल्य-रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते. 

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या दहिसर पू. ते काशिगाव हा पहिला टप्पा आजपासून प्रवासी सेवेत दाखल झाला असून, पुढील दीड वर्षांत मेट्रोने थेट सीएसएमटी, चर्चगेट आणि कफपरेडपर्यंत जाता येणार आहे. यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथून स्थानक बदल करून भुयारी मेट्रोने दक्षिण मुंबईत जाता येईल. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यामुळे आता काशिगाव येथून निघालेल्या प्रवाशाला थेट अंधेरी पूर्वेकडील गुंदवली येथे मेट्रोने पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू झाली आहे.

  • मेट्रो ९ मार्गिका ही भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्थानकापासून सुरू होणार असून, दहिसर पूर्वेला मेट्रो ७ मार्गिकेशी जोडण्यात येणार आहे.
  • सद्य:स्थितीत काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मेट्रो स्थानकापर्यंतच्या मार्गिकेचे काम सुरू असून, येत्या वर्षाअखेरपर्यंत हा मार्गही प्रवासी सेवेत येण्याची आशा आहे.
  • मेट्रो ७ मार्गिका दहिसर पू. येथून सुरू होऊन ती गुंदवलीपर्यंत येते. आता काशिगाव येथून मेट्रोने थेट गुंदवलीपर्यंत पोहोचणे शक्य आहे. गुंदवली ते आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ अशी नवी मेट्रो ७अ मार्गिकेची उभारणी सुरू आहे.
  • दीड वर्षांत मेट्रो ७ मार्गिकेचे काम पूर्ण होईल. हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले झाल्यावर भाईंदर येथून निघालेल्या प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ पर्यंत पोहोचता येईल.
  • तेथून टर्मिनल दोन जवळून जाणाऱ्या आरे ते कफपरेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकावरून पुढे दक्षिण मुंबईकडे जाता येईल. त्यातून मेट्रोचा भाईंदर ते दक्षिण मुंबई असा प्रवास शक्य होणार आहे.


गाड्यांचे वेळापत्रक

  • गुंदवली ते दहिसर पू. मेट्रो ७ आणि दहिसर पू. ते काशिगाव मेट्रो ९ - गुंदवली ते काशिगाव 
  • पहिली गाडी : सकाळी ५:५० (काशिगाव), तर सकाळी ६ (गुंदवली)
  • शेवटची गाडी : रात्री १०.३० (काशिगाव), रात्री ११ (गुंदवली)


वारंवारता

  • गर्दीच्या वेळेत : सुमारे ५:५० मिनिटे
  • इतर वेळेत : ८ ते १० मिनिटे
  • एकूण फेऱ्या : कार्यालयीन दिवस - २७६, शनिवार - २२३, रविवार - २०५.


मेट्रो २बी मार्गिकेचा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मंडाळेपर्यंतचा प्रवास शक्य

काशिगाव येथून आलेल्या प्रवाशांना दहिसर पू. स्थानकात उतरून अंधेरी पश्चिम ते दहिसर पू. मेट्रो २अ मार्गिकेवर जाता येणार आहे. एकाच स्थानकावर दोन्ही मेट्रो मार्गिका असल्याने एका मेट्रोतून उतरून अन्य मेट्रोवर जाण्याची आवश्यकता प्रवाशांना भासणार नाही. त्यातून काशिगाव येथील प्रवाशांना थेट अंधेरी पश्चिमेला पोहचता येईल. तसेच भविष्यात मेट्रो २बी मार्गिकेचा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मानखुर्द मंडाळेपर्यंत जाता येणार आहे. 

Web Title : मेट्रो-9 का उद्घाटन: दो घंटे का सफर 30 मिनट में, सीएम ने कहा

Web Summary : मेट्रो-9 का दहिसर-काशीगाँव चरण खुला, दो घंटे का सफर अब 30 मिनट में होगा। सीएसएमटी तक पूरा मार्ग 1.5 वर्षों में तैयार होने की उम्मीद है। मीरा रोड खंड इस साल तैयार हो जाएगा।

Web Title : Metro-9 Inauguration: Two-Hour Journey in 30 Minutes, Says CM

Web Summary : Metro-9's Dahisar-Kashigaon phase is now open, promising a 30-minute commute instead of two hours. The entire route to CSMT is expected within 1.5 years. The Mira Road section will be ready this year.