मेट्रो-३ चा ‘शेअर टॅक्सी’ला दणका; प्रवासी संख्या ६० टक्क्यांनी घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:14 IST2025-10-11T10:13:41+5:302025-10-11T10:14:01+5:30
सीएसएमटी ते कुलाबा-कफ परेड प्रवासासाठी मेट्रोला पसंती : टॅक्सीचालकांच्या मुजोरीला चाप

मेट्रो-३ चा ‘शेअर टॅक्सी’ला दणका; प्रवासी संख्या ६० टक्क्यांनी घटली
- महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरे ते कफपरेडदरम्यान सुरू झालेल्या मेट्रो ३ मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुलाबा आणि कफ परेडच्या दिशेने चालणाऱ्या शेअर टॅक्सीचे प्रवासी सुमारे ६० ते ६५ टक्के घटल्याचे टॅक्सीचालकांनी सांगितले.
मेट्रोमुळे प्रवाशांना कफ परेडच्या दिशेने जाण्यासाठी किफायतशीर पर्याय उपलब्ध झाल्याने ही घट झाली आहे. परिणामी, आमचे मोठे नुकसान होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
सीएसएमटी, चर्चगेट परिसरात विविध सरकारी आणि खासगी कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, मंत्रालय, विधानभवन तसेच कफ परेड परिसरातील कार्यालयांतील बहुतांश कर्मचारी दररोज सकाळी आणि सायंकाळी या स्टेशनमधून शेअर टॅक्सीने ये-जा करतात. टॅक्सीचालक प्रति प्रवासी ४० रुपये भाडे घेतात, तर इच्छित ठिकाणी मीटरनुसार जाण्यासाठी सहजासहजी एकही टॅक्सीचालक तयार होत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
‘सीएसएमटी’वरून शेअर टॅक्सी चालवून रोज किमान दीड हजार रुपये मिळविण्याचे आम्ही टार्गेट ठेवतो, पण सकाळपासून एकही भाडे मिळाले नसल्याने टॅक्सी मालकाचे पैसेही आता खिशातून द्यावे लागणार आहेत. आम्हाला दुसरा व्यवसाय माहीत नसल्याने असेच सुरू राहिल्यास उपासमारीची वेळ येईल.
रझिक खान, टॅक्सी चालक
मेट्रोमुळे बेस्ट बस आणि शेअर टॅक्सीच्या रांगेपासून आम्हाला दिलासा मिळाला आहे. तसेच प्रवासही किफायतशीर देखील
झाला आहे.
- नंदा पाटील, प्रवासी
मेट्रो- ३ गुरुवारपासून सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ १० ते २० रुपयांमध्ये आरामदायक प्रवास होता. तसेच वेळेतही बचत होत आहे. त्यामुळे टॅक्सी प्रवासाला सक्षम पर्याय उपलब्ध झाला असून, टॅक्सी चालकांच्या मुजोरीपासून आमची सुटका झाल्याचे प्रवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले.