एमसीएचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आता सर्व विद्यार्थ्यांसाठी २ वर्षाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 17:29 IST2020-07-08T17:29:06+5:302020-07-08T17:29:31+5:30
कॉम्प्युटर एप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तीन ऐवजी २ वर्षाचाच अभ्यास करावा लागणार आहे.

एमसीएचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आता सर्व विद्यार्थ्यांसाठी २ वर्षाचा
मुंबई : कॉम्प्युटर एप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तीन ऐवजी २ वर्षाचाच अभ्यास करावा लागणार आहे. एमसीए (मास्टर्स इन कॉम्प्युटर एप्लिकेशन )हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आता २ वर्षांचा निर्णय ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसिटीई ) कडून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात कौन्सिलकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत एमसीए अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षांहून कमी करत दोन वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सचिव राजीव कुमार यांनी दिली आहे.
यापूर्वी एमसीए कोर्स दोन वर्षे आणि तीन वर्षे अशा दोन वेगवेगळ्या मुदतीचा होता. जे विद्यार्थी बीएससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए केल्यानंतर एमसीए करायचे, त्यांची पदवी दोन वर्षांत पूर्ण होत होती. मात्र अन्य विद्यार्थी जे पदवीत गणितासह अन्य अभ्यासक्रम करायचे त्यांना तीन वर्षे कालावीधीचा एमसीए अभ्यासक्रम करावा लागायचा मात्र आता या नवीन निर्णयामुळे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एमसीए कोर्स दोन वर्षांचाच असणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे वाळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक एआयसीटीईकडून सर्व संलग्नित महाविद्यालये व उच्च शैक्षणिक संस्थांना पाठविण्यात आले आहे.
ज्या उमेदवरांनी बीसीए म्हणजेच बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा बीएससी / बीकॉम / गणित घेऊन बी.ए.ची पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा ज्यांना अकरावी, बारावी गणित विषय होता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवले आहेत, असे सर्व एमसीए कोर्सला प्रवेश घेऊ शकणार आहेत.