Join us

Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 09:26 IST

Mumbai Mazgaon Murder: मुंबईतील डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलले.

मुंबईतील डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. संबंधित तरुणाची गळा दाबून हत्या झाल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी तपास केला असता जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाच्या गावातील तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

केशव कुमार चौधरी, असे हत्या झालेल्या तरुणाचे आहे. केशव हा मूळचा बिहारचा आहे. दोन आठवड्यांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईत आलेला केशव हा त्याचा मामा मृत्युंजय झा याच्यासोबत राहत असून माझगावमधील एका निवासी इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. केशवच्या गावातील सनी कुमार चौधरी आणि गिरधारी रॉय हे देखील याच परिसरात राहायला होते.

दरम्यान, सोमवारी रात्री, केशव हा त्याचा मामा, सनी आणि गिरधारी यांच्यासोबत दारू पित असताना गावातील जमिनीवरून त्यांच्यात वाद झाला. हा मिटण्याऐवजी आणखी पेटला. मद्यधुंद अवस्थेत मृत्युंजय आणि त्याच्या दोन मित्रांनी केशववर हल्ला. त्यानंतर मृत्युंजयने केशवच्या मानेवर पाय ठेवून त्याचा गळा दाबला. त्यामुळे केशवचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा लपवण्यासाठी, तिघांनी केशवचा मृतदेह सोसायटीच्या ड्रेनेज टँकमध्ये टाकला. हत्येनंतर, सनी आणि गिरधारी भुसावळला पळून गेले. तर, मृत्युंजय मुंबईतच राहिला. पंरतु, चौकशीदरम्यान पोलिसांना मृत्युंजयवर संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तर, गुन्हे शाखा युनिट ३ ने इतर दोन आरोपींना भुसावळ येथून शोधून काढले आणि त्यांना परत मुंबईला आणले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमहाराष्ट्र