Ashish Shelar: आशिष शेलारांना 'ते' वक्तव्य भोवणार; महापौर किशोरी पेडणेकरांची गृहमंत्र्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:24 IST2021-12-07T16:21:43+5:302021-12-07T16:24:34+5:30
Ashish Shelar controversial statement on Kishori Pednekar: वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले होते. 4 महिन्यांच्या बाळासह त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला.

Ashish Shelar: आशिष शेलारांना 'ते' वक्तव्य भोवणार; महापौर किशोरी पेडणेकरांची गृहमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी 4 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. याविषयी महापौर किशोरी पेडणेकरांवर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याविरोधात आज पेडणेकरांनी राज्य़ाचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून थेट तक्रार केली आहे.
बालकाच्या व वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. सिलिंडर स्फोटाची घटना ही 30 नोव्हेंबरला झाली होती. शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत 'सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात' असे वक्तव्य केले होते. यावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबईची महापौर ही एक महिला आहे. प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. असे असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यामुळे शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार करत असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी महिला आयोगाने देखील अहवाल मागविला आहे.