मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:05 IST2018-11-01T12:04:30+5:302018-11-01T12:05:39+5:30

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबा सोडला आहे.

Mayor decides to shift into Byculla zoo bungalow | मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर

मुंबईच्या महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत; बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थलांतर

मुंबई- महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबा सोडला आहे. ते आता भायखळ्यातील राणीच्या बागेतील सरकारी बंगल्यात राहायला गेले आहेत. महापौर बंगल्यात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते. महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी अधिकृतरीत्या शिवाजी पार्कमधले महापौर निवास सोडलं आहे. त्यामुळे तिथे लवकरच बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाणार आहे.

महाडेश्वर म्हणाले, महापौर बंगल्यात लवकरच बाळासाहेबांचं स्मारक होईल, मी राणीच्या बागेतील सरकारी निवासस्थानी राहायला जातोय. मी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिपूजन सोहळ्याआधीच महापौर निवास खाली केलं आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्त्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करून त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे. 

मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल. मुंबई ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने नुकतीच महापौर बंगल्याला भेट दिली. त्यावेळी समितीकडून या बंगल्याचे आणि पुतळ्यासंदर्भात घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाचे कौतूक करण्यात आले. सन 1928 साली हा बंगला बांधण्यात आला होता, त्यानंतर 1962 साली बीएमसीने हा बंगला विकत घेतला. तर डॉ. बीपी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला. सन 1964-65 मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे ज्या शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित करायचे, तेथून जवळच हा महापौर बंगला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हेच ठिकाण उत्तम असल्याचेही समितीने म्हटले आहे. 

Web Title: Mayor decides to shift into Byculla zoo bungalow