मायेला मुकले; आरोपींना फाशी द्या, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुलगी सिद्धीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:12 IST2025-04-12T08:11:44+5:302025-04-12T08:12:24+5:30
Ashwini Bidre murder case: अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चारपैकी तीन आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह हत्येमध्ये सहभागी असलेल्या कुंदन भंडारी व महेश पाटील यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला आहे.

मायेला मुकले; आरोपींना फाशी द्या, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुलगी सिद्धीची मागणी
पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चारपैकी तीन आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह हत्येमध्ये सहभागी असलेल्या कुंदन भंडारी व महेश पाटील यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला असल्याने त्यांच्या शिक्षेबाबत पनवेल सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी आरोपींना सजा सुनावली जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, न्यायालयाने पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली आहे.
अश्विनी यांची मुलगी सिद्धीने व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करून आपल्या भावना न्यायालयासमोर मांडल्या. कमी वयात आईच्या मायेला मुकावे लागल्याचे सांगत आरोपींना फाशी देण्याची मागणी सिद्धीने केली. अश्विनीचे भाऊ आनंद, वडील यांनीही आरोपीना फाशी देण्याची मागणी केली.
तपासाबाबत नाराजी व्यक्त
पती राजीव गोरे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करून तत्कालीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. पोलिस दल एक कुटुंब असेल तर ही घटना घडल्यापासून ते एकही पोलिस अधिकारी आमच्या पर्यंत आला नाही असे राजीव गोरे म्हणाले. आरोपीकडून कोणताही मोबदला नको, अशी भूमिका गोरे यांनी मांडली.
आमच्या कुटुंबाला त्रास
न्यायालयात बोलताना मुलगी सिद्धी आईच्या आठवणीत भावुक झाली. ‘मी पहिलीत असताना आईला भेटले होते. त्याला आज १० वर्षे झाली. दरम्यानच्या काळात आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा होता. वडिलांना कोल्हापूर ते पनवेल अशा फेऱ्या माराव्या लागल्या, अशा शब्दांत सिद्धीने संघर्ष सांगितला.