Join us  

माथाडींचे नेते नरेंद्र पाटील फडणवीसांचे जबरा फॅन, हातावर गोंदलं देवेंद्रांचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 2:22 PM

नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय.    

मुंबई - माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपली वेगळी चूल मांडली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याता निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. त्यानंतर, त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय.    

''जे पोटात तेच ओठात असणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेव नेते आहेत. त्यांची कार्यपद्धती अन् कर्तुत्वाचे आपण फॅन झालोय," असे नरेंद्र पाटील यांनी हा टॅटू गोंदल्यानंतर म्हटलं. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम पुन्हा जगजाहीर झालंय.   

शिवसेनेला जय महाराष्ट्र

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमिती आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेपासून फारकत घेण्याची घोषणा केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असा दावाही नरेंद्र पाटील यांनी पक्ष सोडताना केला होता.  

राष्ट्रवादी-भाजप-सेना असा प्रवास

नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये आले होते. मात्र २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून हे पद काढून घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकामगारसातारामराठा आरक्षणमुंबईभाजपाशिवसेना