Mumbai Fire Update:मुंबई शहरातील मानखुर्दमधील मंडाळा परिसरात आज सायंकाळच्या सुमारास एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ८ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
मंडाळा येथील भंगार गोदामात लाकूड, प्लास्टिक यांसारख्या ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाचे जवान दाखल होताच स्थानिकांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. सदर गोदामाला आग कशामुळे लागली, याबाबतचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.