घाटकोपरमध्ये विवाहितेची हत्या वैयक्तिक वादातून? पंतनगर ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:47 IST2025-12-27T09:47:09+5:302025-12-27T09:47:18+5:30
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय आहे; मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

घाटकोपरमध्ये विवाहितेची हत्या वैयक्तिक वादातून? पंतनगर ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात एका विवाहितेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. झुडपात गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे नाव अमिना इब्राहिम सिद्दीकी असे आहे. पंतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय आहे; मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अमिना या पती इब्राहिम सिद्दीकी आणि चार मुलांसह घाटकोपरच्या कामराज नगर येथे राहत होत्या. बुधवारी सायंकाळी अमिनाच्या नणंद त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर दोघी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत अमिना घरी न आल्याने इब्राहिम यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम
सुरू केली.
कामराज नगरात झुडपात सापडला अमिनाचा मृतदेह
रुवारी सकाळी कामराज नगर परिसरातील झुडपात अमिनाचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने खोल जखमा केलेल्या होत्या.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले आहेत. तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासण्यात येत आहेत.