दिवसाला अनेक आमंत्रण, पण कोणत्या लग्नाला जाणार? नेतेमंडळीसमोर प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:33 IST2025-04-02T13:32:09+5:302025-04-02T13:33:13+5:30
Marriage: तुळशी विवाह झाल्यांनतर राज्यात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांनी लग्नासाठी एप्रिल, मे महिन्यातील मुहूर्त काढले आहेत. विवाह समारंभाला नेते मंडळी, लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावावी, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांचीही असते.

दिवसाला अनेक आमंत्रण, पण कोणत्या लग्नाला जाणार? नेतेमंडळीसमोर प्रश्न
मुंबई - तुळशी विवाह झाल्यांनतर राज्यात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांनी लग्नासाठी एप्रिल, मे महिन्यातील मुहूर्त काढले आहेत. विवाह समारंभाला नेते मंडळी, लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावावी, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांचीही असते. त्यामुळे स्थानिक आमदार, खासदारांना लग्नाचे हमखास निमंत्रण दिले जाते. मात्र, ठरावीक मुहूर्तांवरील विवाहासाठी अनेकांची आमंत्रणे आल्यास नेमके कोणत्या लग्नाला जायचे, असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण होतो. त्यातही शनिवार, रविवार असेल, तर त्या दिवशीच्या १० ते १५ पत्रिकादेखील येतात. अशावेळी सर्वच ठिकाणी त्यांना जाणे शक्य होत नाही.
कुटुंबातील, पक्ष कार्यकर्ते, मतदारसंघातील नागरिक यांच्या घरातील लग्नाला पहिले प्राधान्य दिले जाते. अनेक वेळा जिथे जाणे शक्य नाही, अशांना वैयक्तिक फोन करून शुभेच्छा देऊन संवाद साधतो. लग्न किंवा अन्य कार्यक्रमासाठी जाताना आधी वाहतुकीचा अंदाज घेतो. पोलिसांकडून संदेश आल्यानंतर पुढील नियोजन केले जाते. ज्या लग्नाला जाणे अत्यावश्यक आहे अशा ठिकाणी प्रथम हजेरी लावतो. खाण्या-पिण्याच्या पथ्यामुळे जेवण टाळतो.
- आ. मंगेश कुडाळकर, शिंदेसना, कुर्ला मतदारसंघ
एकाच दिवशी अनेक ठिकाणी लग्नाला जायचे असल्यास शक्यतो खाणे टाळतो. आमंत्रण देणाऱ्याचा मान म्हणून काही वेळा आईस्क्रीम किंवा थोडे गोड खातो. सर्वच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, काही ठिकाणी जाणे शक्य झाले नाही, तर घरी सत्यनारायण पूजा, हळदी, अशा कार्यक्रमास जातो. आधी नागरिक, त्या नंतर कार्यकर्ता, मग कुटुंब, असे प्राधान्य आहे. आमंत्रण देणाऱ्याला नाराज करता येत नसल्यामुळे लग्नाला जावेच लागते.
- आ. अनंत (बाळा) नर, उद्धवसेना, जोगेश्वरी मतदारसंघ
जास्त लग्नं असली, तरी नियोजन करून शक्यतो सगळ्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या पक्षाचे असले तरी पाच मिनिटे थांबले, तरी आमंत्रण देणाऱ्यालाही समाधान वाटते. मतदारसंघात दक्षिण भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यांच्या जेवणाच्या डिशेस वेगवेगळ्या असतात. अशावेळी लग्नात त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेते. सकाळी नाश्ता करून घराबाहेर पडते.
- आ. ज्योती गायकवाड,
काँग्रेस, धारावी मतदारसंघ