Join us  

"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 1:14 PM

अमोल मिटकरीसारखा आमदार जो केवळ मिमिक्री करतो. काही वर्षांपूर्वी तो ५-१० हजार रुपये घेऊन शिवचरित्र सांगायचा

मुंबई - निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटालाच देण्यात येत असल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये शाब्दीक वॉर सुरू झाल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करतात. तर, अजित पवार गटाकडूनही त्यांच्यावर पलटवार केला जातो. आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणत अजित पवारांना लक्ष्य केले. त्यावर, आमदारअमोल मिटकरी यांनी पलटवार केला. त्यानंतर, अजित पवार गटाच्या विकास लावंडे यांनी मिटकरींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

जितेंद्र आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणत अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यास, आमदारअमोल मिटकरी यांनी तथाकथित पुरोगामी म्हणत आव्हाडांवर पलटवार केला. दोन्ही गटातील काही नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यात, आता अजित पवार गटाच्या विकास लावंडे यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आ. अमोल मिटकरींवर जबरी टीका केली. यांच्याकडे कुठलीही वैचारीक भूमिका नसल्याने ते बाश्कळ बडबड करतात, कारण ते दोघेही अजित पवार गटाचे लाभार्थी आहेत, असे त्यांनी म्हटले. 

अमोल मिटकरीसारखा आमदार जो केवळ मिमिक्री करतो. काही वर्षांपूर्वी तो ५-१० हजार रुपये घेऊन शिवचरित्र सांगायचा, जो स्वत:ला शिवव्याख्याता म्हणतो, पण त्याला शिवछत्रपती नीट माहिती नाहीत, त्याला पुरोगामी विचार कळालेला नाही. कुठली तात्विक बैठक नाही, केवळ बाजारू विचारवंत म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे, अशा शब्दात विकास लावंडे यांनी मिटकरींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, ज्याला स्वत:ची ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही, जिल्हा परिषदेला त्याचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकांवर राहिला. केवळ अजित दादांची दिशाभूल करुन तो आमदार बनला. त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती आहेत, त्याची व्हिडिओ आम्हाला माहिती आहेत, तो महिलांसोबत कसा वागतो हेही आम्हाला माहिती आहे. त्यामुळे, मिटकरींसारख्या बाजारू विचारवंताने आमदार जितेंद्र आव्हाडांवर टीका करु नये, अशा शब्दात विकास लावंडे यांनी मिटकरींना तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलंय. 

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन विकास लावंडे यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये, लावंडे हे अमोल मिटकरी व रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना दिसून येतात.  

टॅग्स :अमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेसजितेंद्र आव्हाडआमदार