Join us
Daily Top 2Weekly Top 5

मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:01 IST

मरीन ड्राइव्ह येथे १२ मे २०२० रोजी एका कार अपघातात एका व्यक्तीचा बळी गेला होता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मरीन ड्राइव्ह येथे १२ मे २०२० रोजी एका कार अपघातात एका व्यक्तीचा बळी गेला होता. त्यावेळी घडलेली परिस्थिती ही अपघाती होती आणि ती केवळ एका निष्काळजीपणाच्या कृत्यामुळे घडली होती. तो ‘सदोष मनुष्यवधा’चा प्रकार नव्हता, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. एका १९ वर्षीय मुलावरील गंभीर स्वरूपाचा आरोप वगळण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले. शौर्य जैन (१९) याला त्याच्या कृतीमुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो याची पूर्वकल्पना होती,  असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांनी जैनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (भाग २)अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या कलमानुसार, एखाद्या व्यक्तीला आपल्या कृतीमुळे मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असूनही ती कृती केल्यास, जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सरकारी वकिलांच्या मते, जैनने बेफिकीरपणे गाडी चालवत उभ्या बसला धडक दिली, त्यामुळे त्याच्या १८ वर्षीय मित्राचा मृत्यू झाला. त्याच्याकडे त्या वेळी ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते, असेही आरोप होते. जखमी मित्राचा आठवडाभरानंतर मृत्यू झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने जैनविरुद्धचे कलम ३०४(२) रद्द केले. न्यायालयाने म्हटले केले की, हा दारू पिऊन वाहन चालवण्याचा प्रकार नाही आणि आरोपी स्वतःही या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे हा प्रकार जास्तीत जास्त ‘निष्काळजीपणा’ म्हणून पाहता येईल. मृत मुलाचे वडील राजेश नागपाल यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

काय म्हणाले न्यायालय?

न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांनी मुलाच्या वडिलांची याचिका फेटाळून लावली. त्यांनी म्हटले की, अपघात अचानक झाला व आरोपीलाही दुखापत झाली, त्यामुळे त्याला मृत्यू होण्याची जाणीव होती, असे सिद्ध होत नाही.  कागदपत्रांनुसार आरोपीला वाहन चालवण्याचे कौशल्य होते आणि हा अपघात अचानक घडलेला होता, असे न्यायालय म्हणाले. आता जैनवर परवाना नसताना निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवून आणणे  हे आरोप कायम राहातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Marine Drive Accident Due to Negligence; Culpable Homicide Charge Dropped: High Court

Web Summary : High Court upheld dropping culpable homicide charge in a Marine Drive accident case. The court deemed the 2020 death accidental, resulting from negligence, not intentional killing. Accused lacked awareness his actions could cause death, court stated.
टॅग्स :अपघातमुंबई हायकोर्ट