Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याचे कोरोनानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 08:28 IST

सुधाकर शिंदे यांच्या निधनाने सारेच हळहळले असून सोशल मीडियातून मराठी अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही शिंदेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसुधाकर शिंदे यांच्या निधनाने सारेच हळहळले असून सोशल मीडियातून मराठी अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही शिंदेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आणि महाराष्ट्र पुत्र आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे आज पुण्यात निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना नांदेडहून पुण्याला आणण्यात आले होते. अवघे ३४ वर्षे वय असलेले शिंदे हे नुकतेच त्रिपुराहूननांदेड येथे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने प्रथम त्यांच्यावर नांदेड येथे तसेच नंतर औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यात आणले गेले होते. 

सुधाकर शिंदे यांच्या निधनाने सारेच हळहळले असून सोशल मीडियातून मराठी अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही शिंदेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'सुधाकर शिंदे यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने त्रिपुराने एक मृदु स्वभावाचा कर्तबगार अधिकारी गमावला आहे. राज्याची आज खूप मोठी हानी झाली आहे', अशा भावना देव यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. शिंदे यांच्या पत्नीशी संपर्क साधून सांत्वन व्यक्त केल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन सांगितले. 

आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिंदेंना श्रद्धांजली वाहिली. तसेच, कोरोनामुळे सुधाकर शिंदे यांचे निधन झाल्याचेही शरण यांनी सांगितले. तर, प्रियंका शुक्ला यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहताना, कोरोनाविरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. तसेच, त्रिपुरामधील कारागृहांची सुधारणा करणारा कार्यतत्पर अधिकारी आपल्यातून निधून गेला, अशा भावनाही शुक्ला यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, आज पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यात्रिपुरानांदेडपुणेमृत्यू