मुंबई - आझाद मैदानावर नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनानंतर शिंदेसेनेचे खा. मिलिंद देवरा यांनी मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धवसेनेसह विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
खा. देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी दक्षिण मुंबईत होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध घालावे किंवा निदर्शनासाठी वेगळे ठिकाण निश्चित करावे, अशी मागणी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. आंदोलनाचा हक्क लोकशाहीतील मूलभूत अधिकार असला तरी तो सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे देवरा यांनी नमूद केले आहे. शासन आणि प्रशासनाचे केंद्रस्थान असलेल्या दक्षिण मुंबईत मंत्रालय, विधानभवन, महापालिका मुख्यालय, पोलिस मुख्यालय तसेच पश्चिम नौदल कमांड यांसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
हाच शिंदे गटाचा खरा चेहरा आहे. मुंबईत मराठी माणूस आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे. मुंबईचा सातबारा त्यांना लिहून दिला आहे का? - खा. संजय राऊत, उद्धवसेना
ही सरंजामशाही मानसिकता आहे. देवरा यांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवले आहे. आंदोलन हा लोकशाहीचा पाया आहे. हे कोण विरोध करणारे?सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस