Join us  

ज्याला ‘मराठी’चा पेपर सोपा गेला, तोच होणार खासदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:51 AM

उत्तर पूर्व मुंबईतील वाढलेल्या मतदानाच्या टक्यामुळे युती आघाडीच्या उमेदवारांचा विश्वास दुणावला आहे. युतीच्या उमेदवाराच्या मते हा आघाडीला धक्का, तर आघाडीच्या मते ही परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल आहे

मनीषा म्हात्रेउत्तर पूर्व मुंबईतील वाढलेल्या मतदानाच्या टक्यामुळे युती आघाडीच्या उमेदवारांचा विश्वास दुणावला आहे. युतीच्या उमेदवाराच्या मते हा आघाडीला धक्का, तर आघाडीच्या मते ही परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल आहे. त्यामुळे कुणाला धक्का बसतो आणि कुणाला आधार मिळतो? हे निकालातूनच स्पष्ट होईल.

मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत परसरलेल्या उत्तर पूर्व मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला. दिवसभरात या मतदारसंघामध्ये ५७.१५ टक्के मतदानाची नोंद झाली (एकूण ९ लाख ७ हजार ७६८ मतदार). गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.४५ टक्के मतदान वाढले. यात ४ लाख ३ हजार ४३० महिला, ५ लाख ४ हजार २९८ पुरुष, तर ४० तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता.मुलूंड, भांडुप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या मुलूंड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक ६३.६६ टक्के, तर मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी म्हणजेच ४७.८ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच घाटकोपर पूर्व येथे ६१.२७, कोकणी मराठी मतदार असलेल्या भांडुप आणि विक्रोळीमध्ये अनुक्रमे ५८.९९ आणि ५७.३० टक्के मतदान झाले. ही मराठी मते कोणाच्या बाजूने फिरतात यावरही कोटक आणि पाटील यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

२०१४ च्या तुलनेत मुलुंड, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील आकडा ४ टक्क्यांनी वाढला. तर भांडुप ९, विक्रोळी ७, मानखुर्द शिवाजीनगर मधील टक्का ७ ने वाढला आहे. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकरनगर, कामराजनगर, विक्रोळीतील कन्नमवार नगरसोबतच विभागातील दलीत वस्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जोर मतदानाच्या दिवशी दिसून येत होता. वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव उत्तर-पूर्व मतदारसंघातील निकालावर काही प्रमाणात परिणाम करण्याची शक्यता आहे.

कोटक १५ वर्षे नगरसेवक, गटनेता असल्याने मतदारसंघातील युतीच्या, अन्य नगरसेवकांशी घनिष्ठ संबंध आहेत. मात्र त्याचवेळी मुलुंड किंवा भांडुप वगळता उर्वरित चार विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांना त्यांची फारशी ओळख नव्हती. सोमय्या नव्हेत, तर मी यंदा महायुतीचा उमेदवार आहे, हे मतदारांवर बिंबवण्याचे प्रमुख आव्हान कोटक यांच्यावर होते. मात्र अखेरच्या टप्प्यात प्रचाराचे विविध फंडे आणि त्यानंतर झालेल्या सभेमुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मनसे फॅक्टर लक्षात घेऊन त्यांनी मराठी वस्त्या प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवल्या होत्या. परिक्षेत टक्के वाढविण्यासाठी जसा सोप्या विषयाच्या अभ्यासावर अधिक भर दिला जातो, तसेच काहीसे चित्र कोटक यांच्या बाबतीत पहावयास मिळाले.

या मतदारसंघात सात लाखांहून अधिक मराठी, सुमारे दोन लाख गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळेच महाआघाडीने सुरूवातीपासून खासदार मराठी की गुजराती? असा प्रचार सुरू केला. त्यांच्या प्रचारात पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे उतरल्या. अखेरच्या टप्प्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमुळेही येथील वातावरण तापले. मात्र त्याचा मतदारांवर किती प्रभाव पडला, हे निकालातून स्पष्ट होईल.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमनसेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा