Join us

'मराठी केवळ मातृभाषाच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 14:11 IST

शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई - मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघू शकत आहोत. त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहिलेला अग्रलेख ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती.  मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे. याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. 

शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून  पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी झालेल्या परिसंवादातील “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, डॉ. विजया वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले. “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार” या विषयावरील परिसंवादात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, बुकगंगा डॉट कॉमचे मंदार जोगळेकर, स्टोरी टेल ॲपचे प्रसाद मिरासदार, युनिक फिचर्सचे आनंद अवधानी, पत्रकार रश्मी पुराणिक माजी सनदी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख, वक्ते म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रीमती उत्तरा मोने यांनी केले. या दूरदृश्य प्रणाली परिसंवादात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, मराठी भाषाप्रेमी मान्यवर, पत्रकार, महाविद्यालयीन प्राध्यापक-विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेमराठी भाषा दिनछत्रपती शिवाजी महाराज