'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:17 IST2025-05-15T16:16:40+5:302025-05-15T16:17:22+5:30
मराठी न बोलण्यावरून नाही तर पिझ्झाच्या क्वालिटीवरून वाद सुरू झाल्याचं आता समोर आलं आहे.

'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
भांडुप परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचं म्हटलं गेलं. हा संपूर्ण प्रकार डिलिव्हरी बॉयने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. मात्र याबद्दल आता वेगळाच खुलासा करण्यात आला आहे. भांडुपच्या महिलेनेच या व्हायरल व्हिडीओमागची खरी स्टोरी सांगितली आहे.
मराठी न बोलण्यावरून नाही तर पिझ्झाच्या क्वालिटीवरून वाद सुरू झाल्याचं आता समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर व्हिडीओमध्ये दिसणारं जोडपं नसून आई आणि मुलगा आहे. भांडुप पश्चिम परिसरातील साई राधा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डॉक्टर वैदेही पाठक यांनी डॉमिनोजचा पिझ्झा ऑर्डर केला होता आणि त्याचे पैसे ऑनलाईन स्वरूपात आधीच दिले होते. मात्र काही वेळा पिझ्झा खराब स्वरुपात आल्यामुळे त्यांनी मला पिझ्झा उघडून दाखवा असं सांगितलं.
डिलिव्हरी बॉयने त्यांच्याशी हुज्जत घालत 'मराठी येत नाही, जे करायचं आहे ते करा' असं म्हणत व्हिडीओ काढला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर वैदेही पाठक यांनी आपली बाजू मांडत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "माझी काहीच चूक नव्हती. एक छोटासा इश्यू झाला होता. मी पिझ्झा ऑर्डर केला होता. पण मागच्या अनुभवावरून मी त्यांना आधी उघडून दाखवा असं सांगितलं. कारण याआधी दोन-तीनवेळा चांगला अनुभव आला नव्हता. बॉक्स डॅमेज झाला होता. यावर डिलिव्हर बॉय म्हणाला की, असं तुम्ही बोलू शकत नाही."
"आम्ही ७९९ चं पेमेंट आधीच केलं होतं. माझ्याकडे त्याचा स्क्रिनशॉट आहे. तुम्ही मराठीत बोला, मला तुमचं हिंदी नीट समजत नाही... एवढंच मी त्यांना म्हटलं. त्यावरून तो मुद्दा व्हायरल झाला. त्याने मी मराठी बोलणार नाही असं सांगितलं. तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तुम्ही मराठी बोलायला भाग पाडताय असं म्हणाला. डिलिव्हरी बॉय व्हि़डीओमध्ये जे बोलत आहे ते चुकीचं आहे. त्याने व्हिडीओ व्हायरल केला त्यावर माझा आक्षेप आहे. कारण त्यानंतर मला भयानक मानसिक त्रास झाला आहे" असं वैदेही पाठक यांनी सांगितलं आहे.
मनसेने या घटनेनंतर डॉमिनोजला धडक देत तंबी दिली. महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर मराठी भाषा यावी लागेल, ती शिकावी लागेल असं म्हटलं. तसेच डिलिव्हरी बॉय रोहित लवेराला मनसे स्टाइलने समज दिली. त्यानंतर रोहितने मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल माफी मागितली आहे. "मनसेची टीम पाठीशी उभी राहिल्याने न्याय मिळाला" असं देखील वैदेही पाठक यांनी म्हटलं आहे.
#Mumbai में डोमिनोज पिज्जा के डिलीवरी बॉय को कस्टमर ने कहा "मराठी बोलो..तो ही पैसे देंगे..12 मई को भांडुप इलाके में डोमिनोज़ पिज्जा के डिलीवरी बॉय रोहित लेवरे को कस्टमर ने पिज्जा के पैसे देने से मना किया क्योंकि "रोहित को मराठी बोलनी नहीं आती..वीडियो आया सामने..@TNNavbharatpic.twitter.com/4x1X0VRX4N
— Atul singh (@atuljmd123) May 13, 2025