मराठीकडे पाठ, इंग्रजी शाळांमध्ये मात्र वाढ; १३ वर्षांत पालिका शाळेत आठ हजार विद्यार्थी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:27 IST2025-07-03T09:27:16+5:302025-07-03T09:27:39+5:30
मराठी माध्यमात शिक्षक, विद्यार्थी कमी, तर इंग्रजी माध्यमात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांकडेही पालिकेने लक्ष द्यावे. यासाठी बीट अधिकारी संख्या वाढवणे दर्जा, सुधारणे, शाळांचे नियंत्रण नियमित करणे अत्यावश्यक आहे.

मराठीकडे पाठ, इंग्रजी शाळांमध्ये मात्र वाढ; १३ वर्षांत पालिका शाळेत आठ हजार विद्यार्थी वाढले
घनश्याम सोनार
मुंबई : महापालिकेच्या मराठी शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवीत असताना इंग्रजी शाळांमध्ये मात्र १३ वर्षांत आठ हजार विद्यार्थी वाढले आहेत. पालिकेच्या सीबीएसई शाळांत तर फक्त चार वर्षांत नऊ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहिती अधिकारातून समोर आली आहे.
१३ वर्षांत पालिकेच्या मराठी, हिंदी माध्यमाच्या शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये घट झाली आहे. परंतु, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये १३ वर्षांपासून तसेच पालिकेच्या सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये चार वर्षांत विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांमध्येही वाढ झाली आहे. महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २०१२-१३ या वर्षी एकूण ३३ हजार ५५९ विद्यार्थी, ५१ शाळा आणि ८२६ शिक्षक होते. २०२४-२५ पर्यंत त्यात वाढ होऊन ४१,६११ विद्यार्थी, ६० शाळा आणि हजारांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहे. पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज व इंटरनॅशनल मंडळाच्या २०२४-२५ या वर्षी २१ शाळांत ११,६५१ विद्यार्थी आणि २१४ शिक्षक आहेत. २०२३-२४ यावर्षी १७ शाळांत ४,०६३ विद्यार्थी आणि १६० शिक्षक होते. २०२२-२३ या वर्षी १४ शाळामध्ये ४,४३६ विद्यार्थी ११५ शिक्षक होते.
मराठी माध्यमात शिक्षक, विद्यार्थी कमी, तर इंग्रजी माध्यमात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांकडेही पालिकेने लक्ष द्यावे. यासाठी बीट अधिकारी संख्या वाढवणे दर्जा, सुधारणे, शाळांचे नियंत्रण नियमित करणे अत्यावश्यक आहे.
अरविंद वैद्य, शिक्षण तज्ज्ञ
२०१२-१३ मध्ये ३८५ मराठी शाळा, ८१,२१६ विद्यार्थी आणि ३,८७३ शिक्षक.
२०२४-२५ मध्ये २५४ मराठी शाळा, ३६,२०५ विद्यार्थी आणि ९२६ शिक्षक कार्यरत
वर्ष इंग्रजी शाळा विद्यार्थी शिक्षक संख्या
२०१२-१३ ५१ ३३,५५९ ८२६
२०१३-१४ ५१ ३४,०९९ ८२३
२०१४-१५ ५१ ३४,७६४ ८१३
२०१५-१६ ५४ ३५,८४७ ७९८
२०१६-१७ ५४ ३५,०८० ७८३
२०१७-१८ ५१ ३४,०३१ ७८२
२०१८-१९ ५३ ३२,९१७ ८६२
२०१९-२० ५४ ३३,७३७ १,०३२
२०२०-२१ ५३ ३२,७८६ १,१३२
२०२१-२२ ५४ ३८९९० १,११५
२०२२-२३ ५५ ३९,४३१ १०६३
२०२३-२४ ५३ ३९,२१४ ९८६
२०२४-२५ ६० ४१,६११ १,०१३