मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 06:14 IST2025-07-02T06:13:55+5:302025-07-02T06:14:20+5:30
राज्य परिषद अधिवेशनात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारली भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे

मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
मुंबई : महापालिका निवडणूक जवळ आल्याने मराठीचा पुळका त्यांना येत आहे, पण मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून हद्दपार तुम्हीच केला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता ठणकावले. मराठी भाषा सक्तीचीच आहे आणि राहील पण हिंदीसह सर्व भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मंगळवारी स्वीकारली. या निमित्त आयोजित भाजप राज्य परिषद अधिवेशनात फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींची भाषणे झाली.
फडणवीस म्हणाले की, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचे, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही मराठी माणसाच्या हिताचे, महाराष्ट्र हिताचे राजकारण करतो, कोणाची युती/अयुती झाली पाहिजे म्हणून राजकारण करणारे आम्ही नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट आहे, अशी ओरड आता सुरू झाली आहे. सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीचे अंडे तुम्ही खाल्ले आणि नंतर कोंबडीही खाऊन टाकली. मुंबई, मराठीबाबतच्या फेक नरेटीव्हला भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट नरेटीव्हने प्रत्युत्तर द्यावे. रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पहिल्यांदाच कोकणी माणसाला मिळाले, असे ते म्हणाले.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अरुण सिंह, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री आदी उपस्थित होते. आ.चैनसुख संचेती यांनी प्रास्ताविक केले.
समन्वय ठेवा : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हिंदुत्व हेच भारतीयत्व आणि राष्ट्रीयत्व आहे. भारताला विश्वगुरू करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असेल. अशावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील भाजप पक्षसंघटनेने हातात हात घालून पुढे जावे. प्रगती आणि परिवर्तनाच्या आधारे राज्यात शिवशाही आणावी.
दोन ऑटोचालक अन्...
प्रदेशाध्यक्ष आणि ऑटोचालकांचा काय संबंध आहे माहिती नाही असे म्हणत नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांच्याप्रमाणेच रवींद्र चव्हाणही एकेकाळी ऑटोचालक होते असा उल्लेख केला. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा.
आज माझ्या आईचा पहिला स्मृतिदिन आहे, मी तिला फार वेळ देऊ शकलो नाही, पक्षाला वेळ दिला, पक्षही माझी आईच आहे, असे सांगताना बावनकुळे यांच्या डोळ्यात अश्रू आले. मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचे निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
काँग्रेसचा फेक नरेटीव्ह
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत जाण्यापासून काँग्रेसने दोनवेळा रोखले. मात्र, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा काँग्रेसचा फेक नरेटीव्ह चालला याचे दु:ख मला आहे. आशिष शेलार म्हणाले की विरोधकांची अफवांची शेती आता पुन्हा सुरू होईल पण रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही ती भस्मसात करू.