Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:36 IST2026-04-07T10:14:38+5:302026-04-07T10:36:12+5:30
Mumbai Crime: घाटकोपरमध्ये सार्वजनिक शौचालय वापरल्यावरून मराठी तरुणाला गुजराती व्यावसायिकांची मारहाण केल्याची घटना

Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा मराठी तरुणाला अपमानजनक वागणूक मिळाल्याची घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये स्टेशन परिसरात फक्त सार्वजनिक शौचालय वापरल्याच्या कारणावरून एका मराठी व्यावसायिकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, मनसे याप्रकरणी चांगलीच आक्रमक झाली आहे.
घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली. या इमारतीत महापालिकेच्या बाजार विभागाचे प्रकल्प कार्यालय असून, याच मजल्यावर अक्षय भांगरे यांचे प्रतीक्षा एजन्सी नावाचे कार्यालय आहे. अक्षय गेल्या दीड वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यांच्या कार्यालया शेजारीच व्यवसाय करणाऱ्या दोन गुजराती व्यावसायिकांनी अक्षय यांना त्रास देण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वादाचे कारण सार्वजनिक शौचालयाचा वापर हे होते. अक्षय यांनी इमारतीतील सार्वजनिक शौचालय वापरले, ही बाब या दोन्ही व्यावसायिकांना खटकली. याच किरकोळ कारणावरून दोघांनी अक्षय यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली.
अक्षय भांगरे यांच्या सांगण्यानुसार, "मी गेल्या दीड वर्षांपासून इथे व्यवसाय करतोय, पण गेल्या काही काळापासून हे दोघे विनाकारण त्रास देत होते. सार्वजनिक मालमत्ता असलेले शौचालय वापरणे हा माझा अधिकार असतानाही, त्यांनी मला मारहाण करण्यापर्यंत मजल मारली."
मनसेचा आक्रमक पवित्रा
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात उडी घेतली आहे. मारहाण होऊनही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर मनसेने या वादात उडी घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गुजराती व्यावसायिकाव्या कार्यालयावर धडक दिली. मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी येत असल्याचे समजल्यावर या व्यावसायिकाने कार्यालय बंद करून घेतले. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेथे 'मुंबईत फक्त मराठी' असा बोर्ड लिहीत आंदोलन केले.
मुंबईत मराठी माणसावर होणारा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा 'मनसे स्टाईल'ने आंदोलन करण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.
घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद?
मुंबईत गेल्या काही महिन्यांत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घर नाकारणे, शाकाहार-मांसाहारावरून वाद किंवा भाषेवरून होणारे खटके वाढले आहेत. पोलीस आता या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.