"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:56 IST2025-08-12T09:52:34+5:302025-08-12T09:56:16+5:30

Kishor Kadam Saumitra, CM Devendra Fadnavis : मुंबईतील राहतं घर हातातून जाण्याची वेळ आली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती

marathi actor Kishor Kadam aka poet Saumitra mumbai home in danger CM Devendra Fadnavis to rescue | "आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

Kishor Kadam Saumitra, CM Devendra Fadnavis : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी काल एक फेसबुक पोस्ट करून तक्रार केली. त्यांचं मुंबईतील राहतं घर धोक्यात आलं असल्याची त्यांनी माहिती दिली. बिल्डर आणि सोसायटी कमिटीने फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी पोस्टमधून केला. मुंबईतील राहतं घर हातातून जाण्याची वेळ आली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, या गंभीर समस्येकडे लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना केली होती. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत त्यांना दिलासा दिला.

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल

किशोर कदम यांना शासनाकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलासा दिला. फडणवीसांनी दोन अधिकारी वर्गातील लोकांची नावे सांगत किशोर कदम यांच्या समस्येकडे लक्ष घालण्यास सांगितले. "किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगत किशोर कदम यांना दिलासा दिला.

किशोर कदम यांची तक्रार काय होती?

नमस्कार! मी किशोर कदम. गेली ३०-३५ वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहात असलेल्या सोसायटीत रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर २३ सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात आमची इमारत SRA डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.

कमिटी सदस्य आणि बिल्डरकडून फसवणूक

कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल, PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात. याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे. मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत, कायद्याला धरून आवाज उठवतात, अन्यायाविरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.

एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क बायकॉट केले जाते. त्याच्यापासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते. त्याच्याविरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते. त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.  मुंबईसारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.

घर वाचवण्यासाठी सरकारला विनंती

या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती ,मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी , तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे.

Web Title: marathi actor Kishor Kadam aka poet Saumitra mumbai home in danger CM Devendra Fadnavis to rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.