Join us

अतिशय चांगला तोडगा निघाला, ओबीसींवर अन्याय नाही; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:03 IST

Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो.  

नागपूर  - मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो.  त्याचबरोबर ओबीसी बांधवांच्या मनात जी भीती होती, तसा कुठलाही अन्याय यामुळे होणार नाही, असे स्पष्ट  प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने  प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार सकारात्मकच होते. कायदा आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे आम्ही प्रारंभीपासून सांगत होतो. या नव्या पद्धतीमुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा पुरावे नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचा हा विषय नव्हता, पण ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून मोकळा केला आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे.

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण सुरूच राहील. दरम्यानच्या काळात क्युरेटिव्ह याचिकासुद्धा लागली आहे. त्यातच यश मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे, पण त्यात यश मिळाले नाही, तर सर्वेक्षण कामी येणारच आहे. सुप्रीम कोर्टाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकार