Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:46 IST2025-08-31T16:43:34+5:302025-08-31T16:46:49+5:30
Supriya Sule Meets Manoj Jarange Patil: खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलही माहिती घेतली.

Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
Maratha Reservation: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (३१ ऑगस्ट) मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. त्यांना इलेक्ट्रॉल घेण्याची विनंतीही केली. यातून आपण सगळे मार्ग काढू असेही त्या जरांगे यांना म्हणाल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानात जाऊन जरांगेंची भेट घेतली.
मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
सुप्रिया सुळे मनोज जरांगेंना काय म्हणाल्या?
उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे मनोज जरांगेंना म्हणाल्या, "उठू नका, आराम करा. पाणी घेतलं का? काहीच नाही घेतलं? तुम्ही इलेक्ट्रॉल घेता का थोडंसं?"
त्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या लोकांनी सांगितलं की, त्यांनी काही घेतलं नाही. काही घेत नाहीयेत.
सुप्रिया सुळे जरांगेंना म्हणाल्या, "काळजी घ्या. तुम्ही आराम करा. त्यांना आराम करू देत. तुम्ही बरे व्हा. सगळ्यांवर जबाबदाऱ्या आहेत, विसरू नका. आपण सगळे मिळून मार्ग काढू. स्वच्छतेबद्दल महापालिका आयुक्तांना मी बोलते. पण, तुम्ही काळजी घ्या." त्यानंतर सुप्रिया सुळे तिथून निघाल्या.
आंदोलकांनी सुळेंना अडवलं, पवारांविरोधात घोषणा
खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या कारकडे निघाल्या, तेव्हा काही आंदोलकांनी त्यांना कारजवळच अडवले. 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा दिल्या. काही आंदोलकांनी शरद पवारांविरोधातही घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला, पण काही आंदोलकांनी समोर येत इतरांना शांत केलं आणि सुप्रिया सुळे यांना मार्ग करून दिला.