मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात रणनिती आखणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 17:29 IST2019-03-04T17:22:02+5:302019-03-04T17:29:47+5:30
सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ६ मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात रणनिती आखणार
मुंबई : मराठा समाजाला सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी एकत्रितपणे सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ६ मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे.
संघटनेतील एका समन्वयकाने सांगितले की, २९ नोव्हेंबर २०१८ला राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर राज्य शासनाने स्वत:हूनच सर्व शासकीय विभागांना मराठा आरक्षणातून नियुक्ती देऊ नका, असे आदेश दिले आहेत. या छुप्या आदेशाद्वारे सरकारने कुटनीतीने मराठा समाजाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनातील गुन्हे आश्वासन दिल्यानंतरही मागे घेतलेले नाहीत. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबालाही मदत मिळालेली नाही. परिणामी, संतप्त समाजाने सरकाराविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.