मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला संबोधित केले. सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे, आता आपणही सरकारला सहकार्य करायला हवे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच, मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही, मी शेवटपर्यंत समाजासाठी लढणार, मी मॅनेज होणार नाही, असाही इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला.
"सरकारने आपल्याला सहकार्य केले, आता आपणही सरकारला सहकार्य करू, दोन तासात मुंबई मोकळी करुन द्या, एकही पोलीस नाराज होणार नाही, याची काळीज घ्या. तसेच दारु पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असे वागू नका. कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले. पुढे ते म्हणाले की,"मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, मी शेवटपर्यंत समाजासाठी लढणार आणि मॅनेज होणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले की, जोपर्यंत 'मराठा आणि कुणबी एक आहेत' या मागणीची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेटियरच्या अभ्यासाला १३ महिने उलटूनही काहीच झाले नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करण्याची मागणी त्यांनी केली. 'सगेसोयरे' अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांचे 'सगेसोयरे' पोटजात म्हणून ग्राह्य धरले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत, असे जरांगे यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले असून, त्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसणारे मराठा आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.