मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी पाठविली वकिलांमार्फत माहिती, तीन सहकारी चौकशीसाठी हजर; नोंदवले जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:44 IST2025-11-11T08:44:21+5:302025-11-11T08:44:47+5:30
Maratha agitation: आझाद मैदानातील मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान परवानगी अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या तीन सहकाऱ्यांचे सोमवारी जबाब नोंदवले.

मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी पाठविली वकिलांमार्फत माहिती, तीन सहकारी चौकशीसाठी हजर; नोंदवले जबाब
मुंबई - आझाद मैदानातील मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान परवानगी अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या तीन सहकाऱ्यांचे सोमवारी जबाब नोंदवले. पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना समन्स बजावले होते. मात्र, जरांगे यांनी स्वतः पोलिस ठाण्यात न जाता त्यांच्या वकिलामार्फत माहिती पाठवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशांत सावंत, वीरेंद्र पवार आणि चंद्रकांत भोसले यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. उर्वरित मनोज जरांगे, पांडुरंग तारक आणि सीताराम गंगाधर कळकुटे यांच्या वतीने दोन वकिलांनी आंदोलनासंबंधी लेखी माहिती दिली.
काय म्हणाले पोलीस?
या लेखी निवेदनामध्ये आंदोलनादरम्यान काय घडले?, आंदोलन का करण्यात आले? आणि त्यामागचा हेतू काय होता? यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण केले होते. या आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती.
त्यानंतर एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली; मात्र उर्वरित दिवसांसाठी ना परवानगी मागण्यात आली नव्हती तसेच परवानगी देण्यातही आली नव्हती, असेही पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्ट
करण्यात आले.