Many young women in the prostitution | स्वप्नांचा ‘बाजार’! अनेक तरुणी वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात
स्वप्नांचा ‘बाजार’! अनेक तरुणी वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात

- मनीषा म्हात्रे

मुंबई : नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून ती मायदेशाची सीमा ओलांडून त्याच्यासोबत मुंबईत आली. मायानगरी मुंबईच्या चंदेरी दुनियेला एका नजरेत सामावून घेण्याआधीच तिचा ५० हजारांत सौदा झाला. हे पैसे घरी पोच करतो म्हणून सोबत आलेला तो माघारी परतला तो कायमचाच. जिने तिला विकत घेतले होते, तिने मारहाण करत तिला वेश्याव्यवसायात ढकलले. दोन वर्षांच्या वनवासानंतर एका ग्राहकाकडून तिला अशा मुलींची सुटका करणाऱ्या समाजसेवा शाखेचा नंबर मिळाला आणि तिची या नरकयातनेतून सुटका झाली. तस्करी करून मुंबईत आणल्या गेलेल्या एका २० वर्षीय बांगलादेशी मुलीची ही बोलकी कहाणी...

तिच्याप्रमाणे अनेक तरुणी झगमगत्या चंदेरी दुनियेआडच्या वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात सहज अडकत आहेत. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाबरोबरच सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी केली जात आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जारी केलेल्या २०१८ च्या आकडेवारीनुसार, देशभरात मानवी तस्करीचे २ हजार ४६५ गुन्हे दाखल झाले असून यात ३ हजार ३९५ मुली आणि तरुणींचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे मानवी तस्करीत महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे ४२ अल्पवयीन मुलींसह ७४४ महिलांची तस्करी केल्याची नोंद आहे. तर विविध कारवाईतून तब्बल ७९१ जणींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये ६८० भारतीय महिलांसह ११ नेपाळ, १८ बांगलादेशी तरुणींचा समावेश आहे.

वेश्याव्यवसायासाठी ७२६ जणांची तस्करी करण्यात आल्याची माहितीही समोर आली. कुंटणखान्यापासून सुरू झालेले हे सेक्स रेकेट बॉलीवूडपर्यंत पसरल्याचे समाजसेवा शाखेने सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईतून समोर आले. देश-विदेशासह भारतातील खेड्यापाड्यांतून अनेक तरुणी मायानगरी मुंबईतील बॉलीवूडच्या झगमगत्या चंदेरी दुनियेचे आकर्षण, मॉडेलिंग क्षेत्रात करिअर तसेच, अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येतात खºया. पण यामागचे वास्तव या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर समोर येते. यात नवोदित कलाकार सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसून येत आहेत. मुंबईत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या नादात या तरुणी सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अस्तित्वच हरवून जात आहेत. त्याचाच फायदा दलाल उठवत आहेत.

बॉलीवूडमध्ये असे चालते सेक्स रॅकेट
अनेकदा कास्टिंगदरम्यान अनेक मुलींचे प्रोफाइल आरोपींच्या हातात लागतात. ग्राहक हाती येताच त्यांना मुलींचे हे फोटो दाखवून निवडण्यास सांगितले जाते. त्यानंतर भाव ठरताच ग्राहकालाच हॉटेलमध्ये खोली बुक करण्यास सांगितले जाते. ग्राहकांनी निवडलेल्या मुलींना तडजोड अथवा अभिनेत्रीची भूमिका करण्याचे आमिष दाखवून यात अडकवले जाते. यात, अडकलेल्या बहुतांश मुलींचा खर्चही महिनाकाठी लाखो रुपये असल्याचेही समोर आले आहे. तर यात पंचतारांकित हॉटेल, दलाल, ग्राहकासाठी आधार ठरत आहे. यात हॉटेलचे काही व्यवस्थापकही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या हाती लागली. त्यानुसारही समजासेवा शाखेचे काम सुरू आहे.

हायप्रोफाइल राहणीमान सांभाळत, स्वत:चा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी नाईलाजाने म्हणा किंवा स्वेच्छेने त्या वेश्याव्यवसायात अडकत आहेत. पुढे बाहेर निघण्याचे मार्ग बंद झाल्याने या दुनियेलाच त्या आपलस करत आहेत. घरच्यांना मात्र याची पुसटशीही कल्पना नसते. मुलगी एक सेलिब्रिटी, मॉडेल म्हणून चांगले काम करत आहे. या समजातून त्यांचे मुलींकडे दुर्लक्ष होत आहे, हेही वास्तव तितकेच खरे आहे. जानेवारी महिन्यातील २० दिवसांत समाजसेवा शाखेने बॉलीवूडशी संबंधित ११ मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. यात ४ परदेशी तरुणींचा समावेश आहे.

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या दोन विदेशी तरुणींचीही फसवणूक
पुणे येथील एका महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेणाºया दोन विदेशी तरुणी मूळच्या मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानमधील रहिवासी. विद्यार्थी व्हिसावर शिक्षणासाठी भारतात आल्या आहेत. यापूर्वी दोघीही तरुणी शूटिंगसाठी मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांची ओळख बॉलीवूडमधील निर्मिती व्यवस्थापक नावेद शरीफ अहमद अख्तर (२६) व कास्टिंग डायरेक्टर नावीद सादिक सय्यद (२२) यांच्यासोबत झाली. त्याच्याकडे बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याचाच फायदा उठवत अख्तर व सय्यद यांनी या दोघींना एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी परदेशी मुली हव्या असून त्यासाठी ‘कॉम्प्रमाइज’ करावे लागेल, असे सांगून वेश्याव्यवसायात ढकलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

गुजरात, दिल्लीतून रॅकेट आॅपरेट
आतापर्यंतच्या कारवाईत महाराष्ट्रातील विविध भागांसह गुजरात आणि दिल्लीतून हे हायप्रोफाइल सेक्स रॅकेट आॅपरेट केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यात, बॉलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गजही गुंतले आहेत.
अवघ्या १० हजार रुपयांपासून कोट्यवधींमध्ये मॉडेल्स,
अभिनेत्रींचे त्यांच्या पॉप्युलॅरटीनुसार भाव ठरत आहेत. यात छोट्या पडद्यावरील कलाकारांना ठरलेल्या रकमेपैकी
१० टक्के रक्कमच हाती पडते.
उर्वरित रकमेचे दलाल, आॅपरेटरमध्ये वाटप होते. त्यामुळे हे दलाल मात्र कोट्यधीश बनले आहेत. एक लाखाच्या ठरावात मुलीच्या हातात मात्र १० ते १५ हजार रुपये पडतात. मात्र, ऐशोआरामाचे जीवन जगण्यासाठी या मुलींचीही अशी जास्तीतजास्त कामे करण्याची धडपड दिसून येते.

वेळीच सतर्क व्हा
मुलींनी कुठल्याही फसव्या आमिषांना बळी पडू नये. तसेच ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. पालकांनीही आपली मुलगी काय करते, याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
- संदेश रेवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समाजसेवा शाखा, मुंबई

Web Title: Many young women in the prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.