मुंबई : पश्चिम रेल्वेवर ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या १८९ प्रवाशांच्या कुटुंबीयांपैकी ८० प्रवाशांच्या वारसांना रेल्वेत नोकरी देण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयात सादर करण्यात आलेला मृतांचा आकडा १८९ असल्याचे नमूद आहे. मात्र, रेल्वेने मृतांचा आकडा हा १८६ असल्याची माहिती दिली आहे.साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत विशेष सानुग्रह नियोजनातून अनेक कुटुंबीयांना नोकरी देण्यात आली. यात ८८ मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांनी विविध कारणांमुळे नोकरी नाकारली असल्याचे अधिकारी म्हणाले. तर, १२ कुटुंबांतील सदस्य अल्पवयीन असल्याने ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, ६ जणांनी त्यांचा निर्णय रेल्वेला कळवला नसल्याचे ते म्हणाले.माटुंगा येथे झालेल्या स्फोटात मॅन्युएल डिसोझा यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यांच्या रानिया डिसोझा या मुलीला पश्चिम रेल्वेच्या कर्मचारी विभागामध्ये २०२२ मध्ये नोकरी मिळाली. घटनेवेळी ती केवळ ६ वर्षांची होती. रानिया म्हणाली की, माझे वडील केमिकल इंजिनीअर होते. घटनेवेळी ते दादरवरून परत येत होते. गेल्या अठरा वर्षांमध्ये त्यांच्या जाण्याची पोकळी अजूनही भरून निघालेली नाही.
आम्ही आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या तुटले होतो. रेल्वेने माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी दिली. माझा भाऊ शिक्षण घेत असल्याने आता आम्हाला चांगला आधार मिळाला आहे, असे स्फोटातील मृत्यू झालेल्या प्रवाशाची मुलगी रानिया डिसोझा म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे!मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावे. तसेच सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली. मुंबईच्या लोकल बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे. हा दहशतवादी हल्ला ज्यांनी घडवला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही मुंबईकरांची मागणी आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.