Mansukh Hiren: Thane police have traced the last location of Mansukh Hiren's mobile | Mansukh Hiren: मनुसख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन समोर; प्रकरण आता वेगळ्याच वळणावर!

Mansukh Hiren: मनुसख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन समोर; प्रकरण आता वेगळ्याच वळणावर!

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्य्रात सापडला. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

ठाणेपोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचं लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत का गेले अन् कोणाला भेटायला गेले होते, असे विविध प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे गूढ उकलण्यापूर्वी या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. 

पेडर रोड येथील अँटिलिया बंगल्याचा परिसर आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या मुंब्रा खाडीचा परिसर धुंडाळून काढला. विविध पथके स्थापन करून सर्व शक्यता पडताळून संशयास्पद बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम बँचकडून शनिवारी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे एटीएसचे जयजीत सिंह यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली. मृत  मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाची पाहणी करून त्याबाबत सूचना केल्या.

मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल शनिवारी मिळाला. त्यात त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा नसल्याचे नमूद आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे गूढ कायम आहे. एटीएसकडून त्यांच्या मोबाइलवर आलेल्या कॉल्सच्या सीडीआरद्वारे पडताळणी केली जात असून संबंधितांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडल्यानं हिरेन यांची चौकशी

२५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता एटीएसचे २-३ पोलीस माझ्या घरी आले. तुमची स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेल्या अवस्थेत सापडल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे मला धक्काच बसला. एटीएसच्या पोलिसांनी चौकशी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याचे ४-५ पोलीस रात्री पावणे अकराच्या सुमारास घरी आले आणि चौकशी करुन निघून गेले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि मला घेऊन गेले. सकाळी ६ पर्यंत त्यांनी मला ताब्यात ठेवलं आणि त्यानंतर घरी सोडलं, असं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मनसुख हिरेन यांनी म्हटलं आहे. 

चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचा दावा

मनसुख हिरेन तक्रारीत पुढे म्हणतात, २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातून ३ वाजता फोन आला. १ मार्चला संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. पोलीस सहआयुक्त भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचं सांगितलं.

त्रासापासून मुक्तता हवी

मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या चौकशीच्या त्रासापासून संरक्षण मिळावं, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी केली आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mansukh Hiren: Thane police have traced the last location of Mansukh Hiren's mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.