अंतरवाली सराटी ते नवी मुंबई, असा चालला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 08:07 IST2024-01-28T08:06:34+5:302024-01-28T08:07:53+5:30
Maratha Reservation: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले. अखेर २७ जानेवारी रोजी सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

अंतरवाली सराटी ते नवी मुंबई, असा चालला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले. अखेर २७ जानेवारी रोजी सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
वर्ष २०२३
- २९ ऑगस्ट : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले.
१ सप्टेंबर : उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्याचे लक्ष मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे लागले. राजकीय नेत्यांचे अंतरवालीत दौरे सुरू.
२ सप्टेंबर : मराठवाड्यात अनेक ठिकाणी जिल्हा बंदची घोषणा झाली. काही ठिकाणी बस जाळण्यासह इतर हिंसक प्रतिक्रिया उमटल्या.
८ सप्टेंबर : उपोषणाला बसलेले जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने रात्री मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
१० सप्टेंबर : सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम् संपल्याने जरांगे पाटील यांनी पाणी त्यागले, सलाईनही बंद केली.
१४ सप्टेंबर : १७ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडले. सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला. राज्यभरातील साखळी उपोषण सुरूच ठेवले. जरांगे यांच्या सभांना ठिकठिकाणी सुरुवात झाली.
२५ ऑक्टोंबर : दिलेल्या मुदतीत मागण्या पुर्ण न झाल्याने जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात केली. नेत्यांना अनेक गावांमध्ये प्रवेशास बंदी.
३० ऑक्टोंबर : बीड, माजलगावमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला, जाळपोळ, धाराशिव आणि परभणीमध्येही हिंसक वळण.
०२ नोव्हेंबर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मान्य करत ९ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण जरांगे-पाटील यांनी स्थगित केले.
३ नोव्हेंबर : कुणबी नोंदी शोधण्याची मोहिम राज्यभर राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागिय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश.
१५ नोव्हेंबर : राज्यात मनोज जरांगे-पाटील यांचा संपर्क दौरा.
२३ डिसेंबर : २० जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण करणार अशी बीडच्या इशारा सभेतून घोषणा.
वर्ष २०२४
२० जानेवारी : अंतरवाली सराटी येथून जरांगे यांच्या नेतृत्त्वात समाजबांधवांचे मुंबईच्या दिशेने प्रस्थान.
२६ जानेवारी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले.