Manoj Jarange Latest News: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्टपासून या उपोषणाला सुरूवात झाली. त्यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन राज्य सरकारने शिंदे समितीची स्थापन केली होती. मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समिती करत आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे.
शिंदे समितीने घेतली मनोज जरांगेंची भेट
आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मैदानात आंदोलकांची गर्दी वाढत असून, शनिवारी (३० ऑगस्ट) सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी समिती सदस्यांसह मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी जरांगेंसोबत त्यांची चर्चा झाली.
पुन्हा परवानगी घ्यावी लागणार
आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे यांना सुरुवातीला एकाच दिवसाची परवानगी दिली गेली होती. पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा एकाच दिवसाची परवानगी दिली. त्यामुळे आता मैदानात आंदोलन करण्यासाठी पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे.
जरांगे यांनी आंदोलनापूर्वी दिलेल्या हमीपत्रातील अटी, शर्तीचे उल्लंघन झाल्याने शनिवारी तसे होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी त्यांना दिलेल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी दिलेल्या हमीपत्रात वाहतुकीला अडथळा आणणार नाही. वाहनतळाचा वापर आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करू. आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवेन आणि त्यात वाढ होणार नाही. यासह आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती चिथावणीखोर भाषण करणार नाही यासह पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर निर्देशांचे पालन करतील अशा २० अटींची हमी दिली होती.