Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:26 IST2025-08-12T10:24:37+5:302025-08-12T10:26:55+5:30
Manoj Jarange Maratha Morcha Mumbai in Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात बाहेरून मुंबईत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यात मराठा आंदोलक मुंबईत येऊन धडकले तर प्रचंड गर्दी होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असा सूर आता उमटू लागल्याचे म्हटले जात आहे.

Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
Mumbai Maratha Morcha in Ganeshotsav 2025:मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा निर्धार पक्का केला आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. समाजाने जास्तीत जास्त संख्येने मुंबईत यावे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील करत आहेत. २७ ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, यापुढे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार आहेत.
मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम असते. मुंबईसह लगतच्या अनेक भागांतून मुंबईतील गणपती पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. मोठी मंडळे, मोठे गणपती, देखावे हे पाहण्याची लोकांना खूपच उत्सुकता असते. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच जण गणपती चरणी नतमस्तक होत असतात. अशातच लाखो मराठा आंदोलक मुंबईत येऊन धडकले, तर मुंबईवरील ताण वाढेल, अशी चर्चा आता सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
गणेशोत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. आधीच गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, याच कालावधीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य आंदोलन व मोर्चाची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून, मराठा समाजाचा मोर्चा आल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून काही मार्ग काढता येतो का, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असा सूर उमटत असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवात मुंबईबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. गणेशोत्सवाचे दहा दिवस मुंबईतील रस्ते गर्दीने तुडूंब असतात. दरदिवशी लाखो लोक मुंबईबाहेरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच दीड, पाच दिवसांचे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर गर्दी वाढत जाते. शेवटच्या दिवशीही गर्दी १० लाखांपर्यंत जाते. गणेशोत्सव काळात आधीच वाहतूक कोंडी होत असते. उत्सवाच्या नंतरच्या पाच दिवसात गर्दीचा उच्चांक असतो. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास मोठी वाहतूक कोंडी, लोकल गाड्यांना गर्दी, रस्त्यांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण मुंबईतच यानिमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढण्याची, नियोजन करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आता होऊ लागली आहे, असे म्हटले जात आहे.