Join us

मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:35 IST

या सुनावणीवेळी आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये, ५ हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टाने सांगितले.

मुंबई  - मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी कोर्टात आंदोलकांचे वकील, याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि पोलिसांनी आपापला युक्तिवाद मांडला. दीड तासाहून अधिक काळ या आंदोलनावर सुनावणी झाली. त्यात आमरण उपोषणाला परवानगी दिली नव्हती असं कोर्टाने म्हटलं. त्याशिवाय ५ हजाराहून अधिक लोक आणू नये याची जबाबदारी आयोजकांची होती अशी निरीक्षण नोंदवत कोर्टाने आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. 

या सुनावणीवेळी आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये, ५ हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टाने सांगितले. तर रस्ते अडवायला, गर्दी करायला जरांगे यांनी सांगितले नाही असं मनोज जरांगे यांचे वकील पिंगळे यांनी कोर्टात म्हटलं, मग रस्त्यावर फिरणाऱ्यांना आवाहन करून तुम्ही मुंबईतून बाहेर घालवणार का असा प्रश्न कोर्टाने वकिलांना केला. कोर्टासमोर डिप्लोमेटिक वागू नका असं न्यायाधीशांनी जरांगेंच्या वकिलांना सुनावले. आझाद मैदानात ५ हजारापेक्षा जास्त लोक नको, सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही नको असं कोर्टाने जरांगेंच्या वकिलांना सांगितले. 

उद्या दुपारी ४ पर्यंत दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करा

आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी आहे. आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलक नको. त्याशिवाय दक्षिण मुंबईतील रस्ते उद्या दुपारी ४ पर्यंत रिकामे करा असे निर्देश हायकोर्टाने दिले आहे. त्याशिवाय आणखी आंदोलक मुंबईत येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना मुंबईच्या बाहेर थांबवावे असे हायकोर्टाने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. आणखी आंदोलक आल्यास राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावीत असं कोर्टाने सांगितले आहे. 

दरम्यान, जेवण आणि पाणी आणण्यास तात्पुरती परवानगी हायकोर्टाने दिली आहे. तर जेवणाचे ट्रक मुंबईत येण्यास परवानगी देऊ नका अशी मागणी सदावर्ते यांनी केली होती. जर असं केले तर इतर समाजालाही परवानगी द्यावी लागेल असं सदावर्ते म्हणाले, त्यावर हायकोर्टाने सगळ्यांनाच आंदोलनाचा अधिकार आहे असं सांगितले. कोर्टाने दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल. मुंबईतील रस्त्यांवर आंदोलन नको, आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्यावे असं हायकोर्टाने म्हटलं. उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा मराठा आंदोलनावर सुनावणी होणार आहे. 

काही समाजकंटक आंदोलनात घुसलेत..

आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असं वेळोवेळी मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते. कोर्टाच्या अटींचे पालन आम्ही केले. परंतु २९ आणि ३० ऑगस्ट रोजी भरपूर पाऊस होता, आझाद मैदानात चिखल झाला होता. मराठा समाजाने कुणाचा हक्क हिरावून घेतला नाही. वाईट गोष्टी सरकारने कोर्टासमोर दाखवल्या. हे आंदोलन सरकारविरोधी आहे. लोकांना त्रास देणारे नाही. काही समाजकंटक बेकायदेशीर कृत्य करत आहेत जेणेकरून आंदोलन भरकटेल. ५ हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टाने सांगितले आहे. त्यावर आता मनोज जरांगे निर्णय घेतील असं वकील पिंगळे यांनी सांगितले.  

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलउच्च न्यायालयमराठा आरक्षणपोलिस