Join us

सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:21 IST

आज सोमवारचा दिवस असल्याने चाकरमानी मुंबईकर कामावर जायला निघाला आहे. त्यात सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरात पोलीस यंत्रणेवरील तणाव वाढला आहे.

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहे. त्यात आझाद मैदानाजवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्टेशनवरील आंदोलकांनी याठिकाणी घोषणाबाजी सुरू केली. त्याशिवाय काही आंदोलकांनी लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसल्याचा प्रकार घडला आहे. 

काही मराठा आंदोलकांनी गार्ड केबिनमध्ये घुसून मराठा आरक्षणाचे पोस्टर्स लोकलच्या काचेवर धरले. त्याशिवाय समोर उभे राहून मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या घोषणा दिल्या. मागील ३ दिवसांपासून रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलक जमले आहेत. रात्रीच्या मुक्कामालाही मराठा आंदोलक रेल्वे स्टेशनचा आसरा घेत आहेत. मराठा आंदोलकांनी संपूर्ण स्टेशन व्यापले आहे. त्याशिवाय या आंदोलकांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात कुणी लोकलला धक्का देत असल्याचे व्हिडिओ प्रसारित करत आहे तर कुणी स्टेशनवर हलगी वाजवून नाचत असल्याचे दिसून आले. सोमवारी आंदोलकांची प्रचंड गर्दी स्टेशनवर जमली त्यावेळी काही आंदोलकांनी थेट लोकल गार्ड केबिनमध्ये घुसून मराठा आरक्षणाचे पोस्टर्स झळकावले. 

आज सोमवारचा दिवस असल्याने चाकरमानी मुंबईकर कामावर जायला निघाला आहे. त्यात सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरात पोलीस यंत्रणेवरील तणाव वाढला आहे. आंदोलकांच्या गर्दीत ठिकठिकाणी नृत्य करण्यात येत होते. काही जणांनी लेझीम हाती धरत डान्स केला. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आंदोलन जसंजसं वाढत चालले आहे तसे मराठा आंदोलकांची गर्दीही वाढत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. लोकलमधील प्रवाशांना गर्दीतून वाट काढून देण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करत आहेत. 

मंत्रालय परिसरातील काही रस्ते बंद

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरातील काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात आंदोलकांची गर्दी वाढल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मराठा आंदोलक मंत्रालय परिसर, शेअर बाजार इमारतीचा परिसर यांसारख्या अनेक ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :मराठा आरक्षणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलोकलमनोज जरांगे-पाटीलरेल्वे